पावसाळा सुरू झाला की आपण मान्सून ट्रिप म्हणून शहाराच्या आसपास फिरायला जातो. काही वेळा थोडी लांबही ट्रिप काढतो. इतकेच नाही तर कधी कामानिमित्तही आपल्याला पावसाळ्यात कारने कुठे ना कुठे जावे लागते. अशावेळी रेनकोट घालणे शक्य नसते. मग गाडीतून खाली उतरल्यावर पाऊस लागू नये यासाठी आपण छत्री घेऊन जातो. मात्र पुन्हा छत्री घेऊन गाडीपाशी आलो आणि छत्री बंद केली की ती कुठे ठेवायची असा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला असतो. मग आपण एकतर ती मागे डीक्कीमध्ये ठेवतो किंवा आपल्या पायापाशी म्हणजेच सीटच्या खाली ठेवतो (Where Do We Keep Wet Umbrella In Cars).
पण त्यामुळे याठिकाणी खूप ओले होते आणि काही वेळाने गाडीत एकप्रकारचा कुबट वास यायला लागतो. पावसामुळे आधीच गाडीच्या खिडकीच्या काचा बंद असतात. त्यात आपण ओली छत्री आत आणली तर कुबटपणा तयार होतो. त्यात छत्री खराब होते ते वेगळेच. इन्स्टाग्रामवर एका पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्यामध्ये एक व्यक्ती ही अतिशय सोपी पण महत्त्वाची ट्रिक आपल्याशी शेअर करतो. त्यामुळे पावसाळ्यातील एक महत्त्वाची समस्या दूर होण्यास मदत होते.
मग ओली छत्री नेमकी कुठे ठेवायची?
ड्रायव्हर सीटच्या बाजूला गाडीचं जे दार असतं त्याठिकाणी एक छोटा कप्पा दिलेला असतो. असा कप्पा काही गाड्यांना फक्त ड्रायव्हर सीटच्या बाजूला असतो तर काही गाड्यांना सगळ्याच दारांना असतो. याठिकाणी छत्री फोल्ड करुन ठेवली की त्यातून येणारं पाणी खाली ओघळतं. त्याठिकाणी तिरकी जागा दिलेली असल्याने हे छत्रीचं पाणी ओघळायला मदत होते. त्यामुळे छत्री काही वेळात निथळते. दरवाजाला ही जागा मुद्दाम दिलेली असते जेणेकरुन पावसाचे पाणी किंवा गाडी धुताना येणारे पाणी गाडीत न जाता ते या दरवाजाला असलेल्या जागेतून खाली पडावे.