ऑनलाईन मार्केट जसे वाढले तसे अॅप्लिकेशनवरुन केल्या जाणाऱ्या कामांचेही प्रमाण वाढले. कधी कपडे, किराणा, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तू, औषधे इथपासून ते वेगवेगळ्या पदार्थांपर्यंत सगळे ऑनलाइन ऑर्डर केले जाऊ लागले. कोरोनासारख्या महामारीत तर आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणे ही गरजच होऊन गेली. नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणासाठी किंवा अन्य काही कारणांनी आपल्या घरापासून दूर राहणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे. तसेच कधी अचानक पाहुणे आले म्हणून, रोजच्या जेवणाचा कंटाळा आला म्हणून आणि कधी गरज म्हणून ऑनलाईन फूड मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले जाते. स्विगी ही फूड डिलिव्हरी देणारी भारतातील मोठी कंपनी असून दिवसाला देशातील वेगवेगळ्या शहरातून त्यांच्याकडे लाखो ऑर्डर येत असतात. भारतातील लोक या कंपनीकडून कोणता पदार्थ सर्वाधिक ऑर्डर करतात हे नुकतेच समोर आले आहे.
बिर्याणी हा भारतीयांचा अतिशय आवडता विषय असून व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणी खाणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. गेल्या ६ वर्षांचा आढावा घेतला तर स्विगीकडे दररोज एका मिनीटाला बिर्याणीच्या ११५ ऑर्डर येतात. म्हणजे दिवसाच्या २४ तासांत किती ऑर्डर येत असतील याची आपण कल्पना करु शकतो. तर स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये सामोसा, पाव भाजी हे पदार्थ ऑर्डर केले जातात. तर गोड पदार्थांमध्ये गुलाबजामला खवय्यांची सर्वाधिक पसंती असून त्यानंतर रसमलाई ऑर्डर केली जाते. आशिया खंडात खाल्ले जाणारे पदार्थ, भारतीय पदार्थ आणि चायनिज पदार्थ भारतीय लोक सर्वाधिक प्रमाणात ऑर्डर करतात तर त्यानंतर मॅक्सिकन आणि कोरीयन पदार्थांचा नंबर लागतो.
तर २०२१ या वर्षात हेल्दी पदार्थ ऑर्डर करण्याचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढल्याचेही कंपनीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. बँगलोर हे आरोग्याबाबत सर्वाधिक जागरुक असणारे शहर असून त्यानंतर हैद्राबाद आणि मुंबईचा क्रमांक लागतो. यामध्ये केटो डाएट करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून केटो फूड ऑर्डर करणाऱ्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी वाढले आहे, तर व्हेगन फूड ऑर्डर करणाऱ्यांचे प्रमाण ८३ टक्क्यांनी वाढले असल्याचे अहवालातून समोर आले आहे. रात्री १० नंतर चीज गार्लिक ब्रेड, पॉपकॉर्न आणि फ्रेंच फ्राईज हे पदार्थ मोठ्या प्रमाणात ऑर्डर केले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तर ७ ते ९ हे सगळ्यात बिझी तास असल्याचे ते सांगतात.
इन्स्टामार्टवरुन २०२१ या वर्षात २ कोटी २८ लाख फळे आणि भाज्यांचे पॅकेट डिलिव्हरी करण्यात आले. यामध्ये टोमॅटो, बटाटा, कांदे, मिरची आणि केळी यांचे प्रमाण सर्वाधिक होते. तर या एका वर्षात १ लाख मास्क, ४ लाख साबण आणि हँडवॉश यांची देशातील वेगवेगळ्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यात आली. तर ७० हजार बँडेड, ५५ हजार डायपर्स, ३ लाख सॅनिटरी नॅपकीनचे पॅक डिलिव्हर करण्यात आल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तसेच २०२१ मध्ये कोरोना स्थितीमुळे औषधांच्या डिलिव्हरीचे प्रमाणही जास्त असल्याचे म्हटले जात आहे.