बिहारची राजधानी पटनामध्ये महापौर पदाची उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या म्हणून त्या बिहारमध्ये प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही तर मिसेस इंडिया म्हणूनही त्यांनी किताब मिळवला आहे. या महिलेचे नाव आहे श्वेता झा. आता त्या चर्चेत येण्याचे कारणही तसेच आहे. राजकारण, मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्धी मिळवलेल्या श्वेता यांनी अचानक आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी हातात एके 47 रायफल घेतली आहे. या फोटोमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या असून त्यांच्याकडे अशाप्रकारचे हत्यार कुठून आले असे प्रश्न उपस्थित होत आहेत (Who Is Shweta Jha with AK47 Rifle Patna Mayor Candidate and Ex Misses India).
कोण आहेत श्वेता झा?
मागील वर्षी श्वेता झा महापौर पदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात होत्या. मात्र त्यावेळी सीता साहू यांनी त्यांना हरवले. श्वेता या माजी मिसेस इंडिया किताब जिंकल्या होत्या. महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी त्या मिसेस इंडियाचा क्राऊन घालून आल्या होत्या. मात्र त्या ही निवडणून हारल्या आणि सीता साहू पटनाच्या महापौर झाल्या.
काय आहे रायफल प्रकरण?
श्वेता झा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रायफल घेतलेले काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले. हे रील्स बनवत असताना पोलिसांनी त्यांच्या विरोधात अगमकुआ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. भारतीय जनता पक्षाची नेता आणि माजी मिसेस इंडिया असलेली व्यक्ती अशाप्रकारे रायफलसोबत फोटो कसे पोस्ट करु शकते म्हणून त्यांच्यावर बरेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. श्वेता यांचे पती चंदन यांनी याविषयी बोलताना आपली पत्नी गँगस्टर बनू इच्छिते असा आरोप केला आहे. निवडणूकीत पराभव झाल्यानंतर श्वेता यांना गुन्हेगार व्हायचे आहे असेही त्यांनी सांगितले. श्वेता यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचेही चंदन यांनी सांगितले.