घटस्फोट हे आजही वैवाहिक नात्यातील अपयश मानले जाते. कुणाचंही लग्न मोडलं की त्यात चूक कुणाची हे शोधण्यात, घटस्फोटीत महिलेला दोषी धरण्यास समाज पुढेच असतो. लोक काय म्हणतील या भीतीने कितीतरी बायका नवऱ्याचा छळ सोसतात, पटत नसलं तरी नातं निभावतात कारण घटस्फोट या शब्दाची भीती. आणि अशा वातावरणात कुणीतरी एकजण आपला घटस्फोट झाला हे राजरोस सांगते. सेलिब्रेट करते. डिव्होर्स म्हणून फोटो शूट करते हे पचनी पडेल. (Who is Tamil actor Shalini stuns internet as she celebrates divorce with photoshoot)
मुळात कुणी असंही म्हणेल की घटस्फोट ही खासगी गोष्ट आहे तर त्याचा असा जाहीर तमाश कशाला. नाही जमलं, घेतला घटस्फोट हे सहज स्वीकारणं जास्त सोपं नाही का, त्यासाठी लोकांना इतका दिखाऊ आनंद दाखवण्याची गरज काय? वाद आहेत, प्रतिवादही आहेत.. पण एका तरुणीने नुकतंच डिव्होर्स फोटोसेशन केलं आणि या विषयाला तोंड फुटले.
साऊथची कलाकार आणि फॅशन डिझायनर शालिनी हिनं तिच्या घटस्फोटाचे फोटोशूट केले. हातात 'DIVORCED' असे पोस्टर घेऊन तिनं हे फोटोशूट केलं. त्यात ती अत्यंत आनंदी दिसते. शालिनी म्हणते घटस्फोट हे कोणत्याही प्रकारे जीवनाचे अपयश नाही. जिथं जमत नाही त्या वैवाहिक जीवनातून बाहेर येणं योग्यच आहे. तरच तुम्ही आनंदी राहू शकता.
कोण आहे शालिनी
घटस्फोटाचं फोटोशूट करणारी शालिनी एक तमिळ टिव्ही अभिनेत्री आहे. मुल्लुम मुलारूम या शोव्हमुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. शालिनी सोशल मीडियावर बरीच ॲक्टीव्ह असते. तिनं रियाज नावाच्या एका व्यक्तीसह ३ वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. रियाज आणि शालिनीला रिया नावाची ३ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. मात्र काही महिन्यांनी दोघांमध्ये भांडणे सुरू झाली.
भांडण इतके वाढले की दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. शालिनीने नवऱ्यावर मानसिक छळाचा आरोपही केला होता. आता शालिनीने रियाजपासून घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटाच्या आनंदात शालिनीने तिचे फोटोशूट करून घेतले आहे. घटस्फोटाचा फोटो शालिनीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोंसोबत शालिनीने एक लांबलचक नोटही लिहिली आहे. यासोबतच शालिनीने हातात एक पोस्टर घेतले आहे. तिचे फोटो सोशल मीडियात बरेच व्हायरल झाले.
काहींना हा आचरटपणा आवडला नाही.
पण अनेकांचं म्हणणं होतं की तिचं फोटोाशूट लाऊड असेल पण घटस्फोट झाला म्हणून बायकांनी तोंड लपवत, अपमानानं जगायचं का? बायकांनाच कायम दोष का दिला जातो? दोघांचं नाही पटलं तर वेगळं होणं यात इतकं लज्जास्पद काय आहे? मतं अनेक आहेत, चर्चा सुरुच आहे.