शीना बोरा प्रकरणात अटक झालेल्या इंद्राणी मुखर्जी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा फेटाळला असल्याने या प्रकरणाची चर्चा परत एकदा सुरू झाली आहे. ९ वर्षापूर्वी देशभरात गाजलेल्या या प्रकरणावरुन बराच गदारोळ झाला होता. शीना बोरा हिची प्रॉपर्टीच्या हक्कावरुन हत्या करण्यात आली. २०१२ मध्ये झालेल्या हत्येची माहिती २०१५ मध्ये समोर आली. मात्र इतकी वर्ष होऊनही या हत्येची गुंतागुंत अजूनही सुटलेली नाही. मात्र इंद्राणी मुखर्जी कधी आजारी पडली म्हणून तर सतत जामीन अर्ज केल्याने तर कधी वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. स्वत:च्या पोटच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप इंद्राणीवर आहे. आता नेमकी कोण आहे ही इंद्राणी मुखर्जी जाणून घेऊया...
१. आयएनएक्स मीडिया ग्रुपची फाऊंडर इंद्राणी मुखर्जी हिचे लग्नाआधीचे नाव पोरी बोरा असे होते. पेशाने ती एचआर कन्सलटंट आणि मिडीया एक्झिक्युटीव्ह होती.
२. तिचे पहिले लग्न सिद्धार्थ दास यांच्याशी झाले. त्यांच्यापासून तिला शीना आणि मिखाईल अशी दोन मुले झाली. या मुलांना गुवाहटी येथे आईवडिलांकडे ठेऊन इंद्राणी कलकत्ता येथे गेली.
३. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतरही तिने मुलांना आपल्या आई-वडिलांकडेच ठेवले.
४. त्यानंतर काही काळाने तिने संजीव खन्ना या व्यक्तीशी लग्न केले आणि त्यांनाही एक मुलगी झाली जिचे नाव विधी आहे.
५. काही काळाने इंद्राणीने दुसऱ्या पतीशीही घटस्फोट घेतला आणि ती मुंबईला आली.
६. याठिकाणी तिने पीटर मुखर्जी या आपल्यापेक्षा १६ वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यावसायिकाशी लग्न केले.
७. कालांतराने तिने शीनाला आपली बहीण म्हणून मुंबईत आणले आणि तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे शीनाला नोकरीही मिळाली.
८. इंद्राणी आपल्या पहिल्या लग्नाबाबत कायम लपवत असे, त्यामुळे ती आपली मुले ही आपली भावंडे असल्याचे सांगत असे.
९. २०१५ पासून शीना बोरा हत्याकांडप्रकरणी तपास सुरु असून, शीनाच्या हत्येचा तिच्यावर आरोप आहे, आईनेच लेकीचा खून केल्याचा हा आरोप गंभीर आहे. एकेकाळी हीच इंद्राणी मुखर्जी पेज थ्री आणि ग्लॅमर जगात मोठे नाव होते.