स्वत:चे करिअर नसणे आणि आर्थिकदृष्ट्या नवऱ्यावर अवलंबून असणे ही एका स्त्रीसाठी निराशाजनक स्थिती असू शकते. आताच्या काळात स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे असणे आणि अर्थिकदृष्ट्या सक्षम असणे ही काळाची गरज आहे. रेडइट या सोशल मीडिया वेबसाइटवर ३७ वर्षीय भारतीय गृहिणीने लोकांना आपण या वयात काय करिअर करु शकतो असे विचारले. त्यावेळी लोक तिच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी तिला करिअरसाठी आणि अर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी एकाहून एक चांगले पर्याय सुचवले. तुम्हाला इंग्लिश विंग्लिश चित्रपटातील शशी आणि तुम्हारी सुलु मधली सुलोचना आठवते. त्यांनाही वयाच्या विशिष्ट टप्प्यावर काहीतरी करायचे आहे आणि स्वत:ची ओळख बनवायची आहे. अशीच काहीशी अवस्था या महिलेची झाल्याने तिने सोशल मीडिया वेबसाइटचा आधार घेतला.
वयाच्या 37 व्या वर्षी संसारात स्थिरस्थावर झालो असून आपण पदवी परीक्षेत नापास झालो असल्याने आपल्याकडे पदवी नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. त्यानंतर आपल्याला नाट्य क्षेत्रात रस असल्याने आपण काही वर्षे या क्षेत्रात काम केले. परंतु त्यातही म्हणावी तशी गती मिळाली नाही आणि नाटकात काम करणे करिअर किंवा प्रोफेशनपेक्षा छंद असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. मी आर्थिक सधन कुटुंबातील असले तरी मला स्वत:चे काहीतरी करायचे आहे. पण मला पू्र्णपणे हरल्यासारखे वाटते कारण माझ्याकडे नोकरीसाठी लागणारे कोणतेही विशेष स्कील नाही. तसेच माझ्याकडे पदवी नसल्याने मला कोण नोकरीवर घेणार असा प्रश्नही ती आपल्या पोस्टमध्ये विचारते. मी आता काहीही केले नाही तरी अगदी सहज घरात बसून राहू शकते पण १० वर्षानंतर मी कुठे असेन असा प्रश्न पडलेल्या या महिलेला भावनिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या भविष्यासाठी करिअर करणे महत्त्वाचे वाटते.
तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला उपयोगी असे सल्ले देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जास्त मागणी असलेला कोडींग किंवा कॉपीरायटींगचा एखादा लहान कोर्स करा असे सांगत तिला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काहींनी वेब डेव्हलपमेंटचा कोर्स करण्याचाही सल्ला दिला आहे. तुमचे यामध्ये सिलेक्शन झाले तर तुमच्यासोबत काम करणारे लोक २४ ते २७ वयोगटातील असतील याची तुम्ही तयारी ठेवायला हवी असेही एकीने पोस्टला उत्तर देताना म्हटले आहे.
तर काही कोर्स केल्यानंतर सुरुवातीला तुम्ही इंटर्नशिप करा आणि त्यानंतर फुल टाइम जॉब शोधा असेही काहींनी सुचवले आहे. तर काहींनी आपण अशाच अनुभवातून पुढे आल्याचे सांगत या महिलेचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वत:चे युट्यूब चॅनल सुरू करण्यापासून ते ब्लॉग चालवण्यापर्यंत एकाहून एक उत्तम पर्याय नेटीझन्सनी तिला सुचवले आहेत. आता ही उत्तरे तिला खरंच उपयोगी पडतात की नाही आणि ती त्याचा सकारात्मक विचार करुन खरंच करीयर करते की नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.