छोट्या पडद्यावरच्या डेली सोप्स म्हणजे अनेक मैत्रिणींचा आवडीचा विषय, कोणत्या मालिकेत काय झालं, कुणाच्या नवऱ्याने काय केलं, त्याची गर्लफ्रेंड काय म्हणाली, हिची साडी कशी, तिचा दागिणा कोणता... असे सगळे विषय मैत्रिणींच्या कट्ट्यावर भारीच चर्चेचे ठरतात. कधी कधी एकेक अख्खं वर्ष एकेका मालिकेने व्यापलेलं असतं.. म्हणजे एवढी तिची लोकप्रियता असते.. तर कधी एखादं वर्ष (year end 2021) मालिकांच्या बाबतीत अगदीच कच्चं ठरतं..
काही वर्षांपुर्वी एकता कपूरच्या (Ekta Kapoor) के सिरिज (K series daily soaps of Ekta Kapoor) मालिकांनी असंच छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं होतं.... आता हे वर्ष गाजवलं ते अनुपमा (Anupama) या हिंदी मालिकेने. इतर मालिकांपेक्षा ही मालिका खूप वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली. हिरो- हिरोईन म्हटले की ते पंचविशीच्या आत- बाहेरचे अगदी कोवळ्या वयातले. पण या मालिकेने या कल्पनेलाच पुर्ण फाटा दिला आणि वयाची चाळिशी ओलांडलेली परिपक्व अनुपमा मालिकेची हिरोईन म्हणून समोर आली. अहमदाबादला (Ahmadabad) राहणाऱ्या उच्च मध्यमवर्गीय गटात मोडणाऱ्या शहा या गुजराती परिवाराची ही कहानी आणि अभिनेत्री रूपाली गांगुली म्हणजे या मालिकेची अनुपमा.
खरं पाहिलं तर अनुपमा मालिकेत (TRP of Anupama) दाखविले जाणारे अनेक प्रसंग सर्वसामान्य घरांमध्ये होण्यासारखे नाहीत. अर्थातच म्हणूनच ती एक मालिका आहे, वास्तव नाही. एवढी साधी बाई कुठे असते का? कुणी एवढं चांगलं कसं काय असू शकतं? नवऱ्याच्या मैत्रीणीचा घरात असलेला मोकळाढाकळा वावर एखादी बाई एवढी कशी काय खपवून घेऊ शकते? नवऱ्याचं त्याच्या मैत्रिणीशी लग्न होऊनही त्याच घरात केवळ सासू- सासऱ्यांच्या आग्रहाखातर राहणं खरंच एखादीला वास्तवात शक्य आहे का? असे अनेक प्रश्न अनुपमा या मालिकेबाबत नेहमीच विचारले जातात. एखाद्या सर्वसामान्य कुटूंबामध्ये अतिशयोक्ती किंवा जवळपास अशक्यच ठरतील, अशा अनेक गोष्टी या मालिकेत दाखवण्यात आल्या आहेत.
पण त्याचबरोबर अनुपमाची व्यक्तीरेखा आणि तिचे विविध कंगोरेही बघण्यासारखे आणि खूप काही शिकण्यासारखे आहेत. नवऱ्याचं प्रेम प्रकरण समोर आल्यानंतर ती प्रचंड हादरून गेली, पण मोडली नाही. समाज काय म्हणेल याची चिंता न करता ती हिंमतीने उभी राहिली आणि नवऱ्याला घटस्फोट दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला तिच्या अस्तित्वाचा प्रवास. स्वत:च अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, जपण्यासाठी अनुपमाची सुरू असणारी लढाई, चाळीशीनंतरही तिने नव्या दमाने सुरु केलेलं तिचं करिअर, कितीही संकटं आली तरी देवावरचा विश्वास, श्रद्धा ढळू न देता आयुष्याकडे अतिशय सकारात्मकतेने पाहण्याचा तिचा दृष्टीकोन या सगळ्या गोष्टी खूपच छान पद्धतीने पडद्यावर दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तर इतर अनेक नकारात्मक मुद्दे किंवा अवास्तव मांडणी याकडे दुर्लक्ष करून प्रेक्षक मालिकेतील चांगल्या बाजू उचलून धरत आहेत.
यामुळेच तर मालिकेचा टीआरपी दिवसेंदिवस चढता आहे. या टीआरपीला आणखी वर नेण्याचे काम केले ते अनुज कपाडियाच्या (Anuj Kapadia from Anupama) जबरदस्त एन्ट्रीने. अनुपमाच्या आयुष्यात सुखाचा धागा बनून आलेला अनुज दिवसेंदिवस प्रेक्षकांना खूपच आवडतो आहे. अनुजची भूमिका साकारणाऱ्या गौरव खन्नाने दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. त्याच्या लूक्सने सध्या अनेक जणींना दिवाने केले असून तरूणींमध्येही अनुज कपाडियाची प्रचंड चर्चा आहे.
अनुज- अनुपमामध्ये फुलणारे प्रेम रसिकांना आवडते आहे. तारूण्याच्या प्रेमात असणारा उथळपणा किंवा याच मालिकेतील मिडल एज प्रेम कहाणीचेच एक उदाहरण असणाऱ्या वनराज- काव्या यांच्या प्रेमात असणारा भडकपणाही अनुज- अनुपमा यांच्या प्रेमात नाही. म्हणूनच तर प्रेक्षकांना अनुज- अनुपमा यांच्यामधले शांत, संयमी आणि अबोल प्रेम बघायला अतिशय आवडते आहे.