भारतीय संस्कृतीत खाण्याची इतकी विविधता आहे की मैलामैलावर खाण्याच्या पद्धती बदलतात. प्रत्येक राज्यात, शहरात आणि गावात केल्या जाणाऱ्या पदार्थांची काही ना काही खासियत असते. भारताच्या दक्षिण भागात केले जाणारे इडली, डोसा हे पदार्थ तर जगभरात प्रसिद्ध आहेत. डोशाचेही आता अनेक प्रकार पाहायला मिळतात. डोसा हा करायला सोपा, पोटभरीचा आणि पौष्टीक पदार्थ असल्याने आपल्याकडे घरीही सर्रास इडली, डोसा हे पदार्थ केले जातात. मैसूर डोसा, घी डोसा, मसाला डोसा, पेपर डोसा, रवा डोसा, कट डोसा हे त्यातीलच काही प्रकार आपल्याकडे अतिशय आवडीने खाल्ले जातात. असाच एक डोशाचा हटके प्रकार नुकताच व्हायरल झाला आहे. हा आगळावेगळा प्रकार म्हणजे शेवपुरी डोसा.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोसा करताना दिसत आहे. यामध्ये डोसा तव्यावर टाकल्यानंतर तो त्यामध्ये बटाटा भाजी किंवा इतर काही भरण्याऐवजी शेवपुरी भरत असल्याचे दिसते. शेवपुरी किंवा चाटचे पदार्थही आपल्याकडे अतिशय आवडीने खाल्ले जातात. आंबट-गोड असे हे चाटचे चमचमीत पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. डोसा घातल्यावर हा व्यक्ती शेवपुरीची पूर्ण प्लेट या डोशावर घालतो. त्यानंतर ही शेवपुरी डोशावर सगळीकडे पसरवतो. यामध्ये पुऱ्या, शेव, गोड आणि तिखट पाणी, कांदा असे शेवपुरीमध्ये असणारे सगळे पदार्थ असल्याचे दिसते. इतकेच नाही तर शेवपुरी सगळीकडे पसरवून झाल्यावर हा व्यक्ती यावर भरपूर चीजही किसून घालतो. हे झाल्यावर तो डोसा फोल्ड करुन कट करुन लाल आणि हिरव्या चटणीबरोबर खायला देतो. आता अशाप्रकारे साऊथ इंडियन आणि चाट पदार्थ एकत्रित कसे लागत असेल याचा आपण अंदाज करु शकतो.
इन्स्टाग्रामवरील बॉम्बे फूडी टेल्स या पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुंबईच्या बांद्रा येथील लिकींग रोडवर हा आगळावेगळा पदार्थ मिळत असून तुम्हाला कधी हे ट्राय करायचे असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की जाऊ शकता. लोक खाण्याच्या बाबतीत काय प्रयोग करतील सांगता येत नाही. कधी चॉकलेट पाणीपुरी तर कधी गुलाबजाम सामोसा तर कधी मॅगी सँडविच असे काही ना काही प्रयोग करत असतात. यावर नेटीझन्सनी मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अशाप्रकारच्या प्रयोगाला आपली नापसंती दर्शवली आहे तर काहींनी हे आगळंवेगळं कॉम्बिनेशन चांगलं लागेल असं म्हणत या प्रयोगाचे कौतुक केल्याचे दिसते.