माधुरी पेठकर
लग्न करताना मुलं-मुली एकमेकांचं शिक्षण, नोकरी, विचार, आवडीनिवडी, घरदार पाहतात. पण, दक्षिण कोरिया आणि जपानमधील मुली मात्र लग्न करताना वेगळाच विचार करतात. येथील मुलींना आपल्या देशातला मुलगा नवरा म्हणून नको आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील मुली देशाबाहेरच्याच मुलांशी लग्न करीत आहेत. मात्र, त्यांना आशियाई देशातील मुलांशी लग्न करायचं नाहीये. यामागचं कारण म्हणजे लग्नानंतर त्यांना कोणत्याही पारंपरिक बंधनात अडकून न पडता मुक्तपणे आपला नोकरी / व्यवसाय सांभाळायचा आहे.
दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये लग्नानंतर महिलांवर घरातल्या कामांची, मुलांना वाढवण्याची, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी टाकली जाते. महिलांनी त्यांच्या नोकरी, व्यवसायाला महत्त्व न देता घर आणि मुलांकडे आपलं पूर्ण लक्ष द्यायला हवं, अशी येथील पितृसत्ताक व्यवस्थेची अपेक्षा असते. शिवाय या दोन्ही देशांत इतर विकसित देशांच्या तुलनेत महिला आणि पुरुषांच्या आर्थिक मिळकतीत मोठी तफावत असते. शिक्षण आणि करिअर याबाबतीत महत्त्वाकांक्षी असलेल्या मुलींना हे सर्व आता जाचक वाटू लागलं आहे. यासाठीच येथील मुली लग्नासाठी परदेशी मुलांना पसंती देत आहेत.
२०२३ मध्ये दक्षिण कोरियात झालेल्या एकूण आंतरराष्ट्रीय लग्नांची आकडेवारी सांगते की कोरिअन मुलींनी ज्यांच्याशी लग्न केले त्यात २३ टक्के अमेरिकन, १७ टक्के न्यू झीलंडमधली मुलं आहेत. बाकी फ्रान्स, इटली, जर्मनी, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या मुलांना येथील मुलींनी आपला पती म्हणून स्वीकारलं आहे.
मुलींना लग्नाच्या नातेसंबंधात समानता आणि सन्मान हवा आहे.
त्यामुळेच दक्षिण कोरियाप्रमाणे जपानमधील मुलीही आपल्या कार्यालयातील आंतरवंशीय व्यक्तींची जोडीदार म्हणून निवड करू लागल्या आहेत. दक्षिण कोरिया आणि जपान हे देश आर्थिक आणि तंत्रज्ञानात अतिशय प्रगत देश मानले जातात. पण, दोन्ही देशांत असलेली पितृसत्ताक पद्धती, सामाजिक संकेत आणि सांस्कृतिक विचारधारा मात्र लग्नानंतर मुलींच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादतात. दक्षिण कोरियात तर मुलींच्या बाबतीत तीन आज्ञा फार महत्त्वाच्या मानल्या जातात. या आज्ञा मुलींना कायमच पिता, पती आणि मुलगा यांच्या आज्ञेतच राहायचं असं सांगतात. सोबत मुलींनी घरातल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडायलाच हव्यात आणि घरकामासह सर्व पारंपरिक जबाबदारीही घ्यावी, अशी अपेक्षा कायम आहे.
त्यामुळे अनेक मुलींना ‘नको ते लग्न’ असंही वाटू लागलं आहे. म्हणूनच कदाचित अन्य देशातील मुलांशी लग्न करून या देशांतील मुली चौकटीत बांधून ठेवणाऱ्या जाचक परंपरांना नाकारत आहेत.