आपले भारतीय सण साजरे करताना ऋतूचक्राचाही विचार करण्यात आलेला दिसतो. भारतामध्ये प्रत्येक सणानुसार त्याचा पोशाख, जेवणाचे पदार्थ किंवा इतर गोष्टी बदलत असतात. नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि नव्या वर्षात साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा पहिलाच सण असतो. मकरसंक्रांत म्हटलं की सर्वात पहिला आठवतो तो काळा रंग. आपल्याकडे बऱ्याचदा सणांना अथवा कोणत्याही शुभ कार्याला काळा रंग अशुभ मानला जातो. मात्र मकर संक्रांत असा एक सण आहे ज्या सणाला आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात?(Festive Dressing : Why Do We Wear The Colour Black On Makar Sankranti).
थंडीला निरोप देताना..
१. मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र छोटी होते. थंडी कमी होऊ लागते. काळोख्या रात्रींना काळ्या रंगाचे कपडे घालून आपण निरोप देतो असं मानलं जातं.
२. मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचे दुसरे कारण म्हणजे ज्याप्रमाणे पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करण्यास मदत करतो, अजिबात उष्णता शोषून घेत नाही. त्याविरुद्ध काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. जानेवारी महिन्यामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते. थंडीच्या दिवसामध्ये आपले शरीर अधिक ऊबदार राहावे यासाठीच काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात. तिळगूळाने देखील शरीरातील उष्णता टिकून राहाते म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करून तिळगूळ देण्याची प्रथा आहे.
३. नववधूंसाठी या सणाला विशेष महत्व देण्यात येते. नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिले जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रातीला प्रामुख्याने केली जाते.
४. लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतीला नववधूसाठी खास काळ्या रंगांची साडी घेण्यात येते. तसेच सोबत हलव्याचे दागिने परिधान केले जातात. या दिवशी सुवासिनींना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आवर्जून बोलावण्यात येते. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू दिले जातात. यासोबतच एखादी वस्तू वाण म्हणून देण्यात येते.
५. संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी लहान मुलांचे बोरन्हाणं करण्यात येते. यावेळी एका सजवलेल्या पाटावर लहान बाळाला बसवलं जातं. त्याच्याभोवती इतर लहान मुलांना बसवलं जात. त्या बाळाला काळ्या रंगांचे कपडे परिधान करून अंगावर हलव्याचे दागिने, डोक्यावर मुकुट, हातात बासरी अशा अनेक प्रकारच्या दागिन्यांनी सजवलं जात. त्याच्या डोक्यावर कुरमुरे, बोरं, चॉकलेट, गोळ्या मुलांवर उधळतात.