मूल होणे ही जोडीदारांसाठी आणि त्या कुटुंबासाठी अतिशय आनंदाची प्रक्रिया असते. तर प्रेग्नन्सी म्हणजे ९ महिने महिलेच्या पोटात गर्भाची टप्प्याटप्प्याने होणारी वाढ आणि मग गर्भ परीपक्व झाला की दिवस झाल्यावर त्याला जन्म देणे ही प्रक्रिया आपल्याला माहित आहे. पण मूल होणार असे समजल्यावर २ दिवसांत मूल आपल्या हातात आले तर? ऐकायला आश्चर्यकारक वाटणारी ही घटना प्रत्यक्षात घडली आहे. आपण प्रेग्नंट आहोत हे समजल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महिलेची प्रसूती झाली आणि तिचे मूल तिच्या हातात आले. त्यामुळे ही महिला किती भांबावली असणार याची आपण कल्पना करु शकतो. ही घटना अमेरिकेत घडली असून असे कसे झाले असा प्रश्न साहजिकच सगळ्यांना पडत आहे (Woman Delivers Baby Just After 48 Hours of Knowing About Her Pregnancy) .
तर त्याचे झाले असे की शिक्षिका असलेली २३ वर्षीय एक महिला अतिशय थकवा वाटत असल्याने दवाखान्यात गेली. त्यावेळी आपल्याला कामाचा ताण आल्याने असे होत असावे असे तिला वाटले. मात्र डॉक्टरांनी जेव्हा या महिलेला तपासले तेव्हा तिच्या पायावर आलेली सूज आणि शरीरात होणारे बदल डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावेळी या महिलेला बाळ होणार असल्याचे डॉक्टरांनी तिला सांगितले. या महिलेचे नाव पेटन स्टोवर असे असून तिने आपला हा अनुभव स्थानिक मिडीयाशी शेअर केला. लक्षणांवरुन डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याचे सांगतिल्यानंतरही खात्री करुन घेण्यासाठी त्यांनी स्टोवर हिची अल्ट्रासाऊंड टेस्ट केली.
यामध्ये महिलेची किडणी आणि यकृत योग्य पद्धतीने चालत नसल्याचे समजत होते. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल होण्यास सांगण्यात आले. रुग्णालयात भरती झाल्यानंतर त्याच रात्री स्टोवर हिने एका मुलाला जन्म दिला. हे मूल १० आठवडे लवकर जन्माला आले असून त्याचे वजनही सामान्य वजनापेक्षा कमी भरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्टोवर हिला प्रीक्लेम्पसिया ही समस्या झाल्याने तिचे सी सेक्शन करावे लागले. कारण यामध्ये आरोग्याच्या गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. रक्तदाब कमी होऊन शरीराच्या इतर अवयवांना धोका असल्याने डॉक्टरांनी सी सेक्शन करुन महिलेची प्रसूती प्रक्रिया केली. स्टोवर हिचा बॉयफ्रेंड या संपूर्ण प्रक्रियेत तिच्या सोबत होता आणि आपण एका बाळाला जन्म दिल्याचा आपल्याला आनंद असल्याचे तिने सांगितले.