लग्नात विधींपेक्षा सध्या जास्त महत्त्व कशाला असेल तर ते फोटो आणि व्हिडिओशूटला. पण लग्न टिकलं नाही, घटस्फोट झाला तर बायको नवऱ्याकडे पोटगी मागते फोटोग्राफरकडे पैसे परत मागते का? शक्यच नाही. पण सध्या अशी एक घटना नुकतीच घडली. घटस्फोट झाल्यामुळे फोटोशूटचे पैसे फोटोग्राफरकडे मागणाऱ्या महिलेची गोष्ट व्हायरल होत आहे. ती संबंधित महिला आणि फोटोग्राफरमधील व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत(Woman demands a refund for wedding photos after divorce).
नक्की प्रकरण काय?
संबंधित महिला व तिच्या पतीने दक्षिण आफ्रिकेतील डरबनमध्ये २०१९ साली लग्नगाठ बांधली. पण चार वर्षानंतर काही कारणास्तव दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यानंतर लग्नातील कोणत्याच गोष्टींची आता गरज नसल्यानं, तिनं थेट फोटोग्राफरकडे लग्नात फोटो काढण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले आहेत. महिलेचे व फोटोग्राफरचे हे संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
लान्स रोमियो फोटोग्राफी या ट्विटर अकाऊंटवरून हे स्क्रीनशॉट शेअर करण्यात आले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये ती महिला म्हणते, “तुला अजूनही मी आठवते की नाही हे मला माहित नाही. २०१९मध्ये डर्बनमध्ये माझ्या लग्नात तू फोटोशूट केले होते.”
ती पुढे म्हणते, “माझा घटस्फोट झाला आहे आणि लग्नातील फोटोंची मला आणि माझ्या पतीला आता गरज नाही. तुम्ही त्यावेळी खूप छान काम केले. पण आता त्या आठवणी नको आहेत. त्यामुळे फोटोसाठी दिलेले पैसे परत करावे, कारण आम्हाला त्या फोटोंची गरज नाही.”
त्यावर फोटोग्राफर म्हणतो, ''हा विनोद होता का?'. यावर ती महिला नाही असे म्हणते, तेव्हा तो फोटोग्राफर पैसे परत करण्यास नकार देतो आणि त्या महिलेला म्हणतो की, 'पुन्हा ते फोटो माघारी घेऊ शकत नाही.''
यावर महिला म्हणते, 'मी तुमच्याकडे पैसे परत मागू शकते, कारण मला या फोटोंची गरज नाही.' परंतु या गोष्टीसाठी त्या फोटोग्राफरने स्पष्ट नकार दिला. त्यानंतर त्या महिलेने कायदेशीर कारवाई करण्याची धमकीच दिली.
नवऱ्याने मागितली माफी
UPDATE: we got the Husband. Update tomorrow when he gets back to me pic.twitter.com/QUYVVbIwfe
— LanceRomeoPhotography (@LanceRomeo) April 14, 2023
हे चॅट व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या पूर्वपतीने फोटोग्राफरशी संपर्क साधला, व फोटोग्राफरची माफी मागितली. या वेळी नाव न छापण्याच्या अटीवर तो फोटोग्राफरला म्हणाला की, ''मी तुमचे स्क्रीनशॉटमधील चॅट्स वाचले. तिच्या वतीने मी तुमची माफी मागतो. हा खूप लाजिरवाणा प्रकार आहे''. सध्या ही पोस्ट सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल झाली असून, नेटकऱ्यांमध्ये या अजब प्रकाराची चर्चा आहे.