प्राण्यांची आवड असणारे लोक कधी कुत्रा-मांजर पाळतात तर कधी मासे, कासव, पोपट यांसारखे प्राणीही पाळतात. हे प्राणी आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच आपल्यासोबत वाढत असतात. आपण त्यांना इतका जीव लावतो की तेही अगदी आपल्यातलेच एक होऊन जातात. या प्राण्यांवर आपण जीवापाड प्रेमही करतो. या प्राण्यांना आपल्यासोबत झोपवण्यापासून ते त्यांना खायला घालणे, फिरायला नेणे अशा सगळ्या गोष्टी आपण अगदी आवडीने करतो. आता कुत्रा, मांजर किंवा अगदी एखादा पक्षी वगैरे ठिक आहे. पण एखाद्याने थेट मगरच पाळायची ठरवली तर? वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल पण असे प्रत्यक्षात घडले आहे. एका मुलीने साधासुधा प्राणी नाही तर थेट महाकाय अशी मगरच पाळली आहे (Woman Dragging Crocodile in Water and Walking in water Viral Video).
सोशल मीडियावर या तरुणीचा मगर घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून ही तरुणी अजिबात न घाबरता या मगरीसोबत वावरताना दिसत आहे. मगर असं नुसतं म्हटलं तरी आपल्या मनात भितीची भावना निर्माण होते. एखादवेळी मगर पाहिली की आपले धाबे दणाणते. मोठमोठ्या प्राण्यांना आणि माणसालाही एका फटक्यात सहज खाऊन टाकणारी ही मगर किती हिंस्र असते हे वेगळं सांगायला नको. पण या तरुणीला मात्र मगरीची अजिबात भिती वाटत नसल्याचे व्हिडिओतून स्पष्ट दिसते. या मगरीच्या गळ्याला पट्टा बांधून ती तिला पाण्यात चक्कर मारायला नेत असल्याचे कॅमेरात कैद झाले आहे. या व्हिडिओवरुन जशी काय ती मगर नसून पाळीव कुत्रा आहे असे वाटत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
प्राणी पाळायला आवडणं आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणं ठिक आहे पण अशाप्रकारच्या हिंस्त्र प्राण्यांशी दोस्ती करणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. इन्स्टाग्रामवर या तरुणीचा मगर घेऊन जातानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून असंख्य जणांनी हा व्हिडिओ पाहून त्याला लाईक केले आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे.