पटण्याचा एक व्हिडिओ व्हायरल आहे. फोनवर बोलत आपल्याच तंद्रीत चालत निघालेली एक महिला रस्त्यावरच्या मोठ्या मॅनहोलमध्येच पडली. नशिब की अवतीभोवती लोक होते ते धावले आणि त्यांनी तिला बाहेर काढलं. हा व्हिडिओ पाहून अर्थात लोक हसले, तिला नावं ठेवत आहेत. रस्त्यात मधोमध ड्रेनेजचं झाकण काढून ठेवलेलं आणि बाईंचं लक्षच नाही, त्या फोनवर बोलण्यातच व्यग्र. अपघात झालाच पण दैव बलवत्तर म्हणून त्या बाई वाचल्या. या व्हिडिओ संदर्भात अजून जास्त माहिती मिळालेली नाही. मात्र उत्कर्ष सिंग या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केल्याचे स्क्रोल या वेबसाइटने म्हंटले आहे. मात्र हा व्हिडिओ अपवाद आहे का? तर नाही, देशभरात अनेक अपघात मोबाइलवर बोलत चालत असल्याने, लक्ष नसल्याने, मोबाइलवर गाणी ऐकत असल्याने होत असल्याचे आपल्याला रोजच्या बातम्यांमध्ये दिसते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या जून्या वृत्तानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रसिध्द केलेली आकडेवारी जास्त धक्कादायक आहे. या आकडेवारीनुसार मोबाइलवर बोलत गाडी चालवत असल्याने अपघात झाला आणि त्यात देशभरात २०१८मध्ये ३७०७ मृत्यूंची नोंद आहे.२०१९ मध्ये हाच आकडा वाढून ४,९४५ इतका झालेला आहे.
(Image : Google)
गाडी चालवताना सर्रास मोबाइलवर बोलणे ही तर आपल्याकडची आम गोष्ट आहे.त्यामुळे रस्त्यानं चालताना मोबाइलवर बोलणं, रस्ता क्रॉस करताना बोलत चालणं हे सारं आपणही करत असू तर केवळ हा व्हायरल व्हिडिओ पाहून त्या महिलेस हसण्याला काय अर्थ आहे?