एखादे लहान मूल बेपत्ता असेल तर पालकांकडून त्याचा खूप शोध घेतला जातो. नातेवाईक, पोलीस यंत्रणा संभाव्य ठिकाणी या हरवलेल्या मुलाचा शोध घेतात. काही महिने, वर्ष हा शोध सुरू राहतो. मात्र तरीही मूल मिळाले नाही तर एकतर त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला कोणीतरी पळवून नेले यावर शिक्कामोर्तब करुन पालक आणि यंत्रणा मोकळ्या होतात. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेमध्ये लहानपणी किडनॅप करण्यात आलेली एक मुलगी तब्बल ५१ वर्षांनी तिच्या पालकांना भेटली. यावेळी त्यांची काय अवस्था झाली असेल हे आपण शब्दातही स्पष्ट करु शकणार नाही (Woman Kidnapped as a Baby Reunited With Family after 51 Years).
तर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये ही घटना घडली असून द गार्डीयन वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार, ऑगस्ट १९७१ मध्ये मेलिसा हायस्मिथ हिचे अपहरण करण्यात आले होते. घरी सांभाळायला येणाऱ्या मदतनीस महिलेने या लहानग्या मुलीचे अपहरण केले होते. आपल्याला मूल हवे असल्याच्या कारणाने या महिलेने असे केले असावे असा अंदाज नंतर बांधण्यात आला होता. सप्टेंबर २०२२ च्या सुमारास हायस्मिथच्या कुटुंबियाना ती चार्ल्सटन भागाच्या आसपास असल्याचे समजले होते. मात्र हा भाग त्यांच्यापासून ११०० किलोमीटर दूर होता, तरी इतका प्रवास करुन हे कुटुंबिय याठिकाणी गेले.
डीएनए चाचणी, जन्मखूण आणि जन्मतारीख यांवरुन मेलिसा आपली मुलगी असल्याचे तिच्या पालकांनी सिद्ध केले. इतकेच नाही तर इतक्या वर्षांनी ही मुलगी आपल्या पालकांना आणि बहिण-भावंडांना भेटली. तिची बहिण शेरोन म्हणाली आम्हाला या शोधमोहिमेत एजन्सीमुले बराच त्रास सहन करावा लागला. आता इतक्या वर्षांनी आमची बहिण आम्हाला भेटल्याने आम्हाला तिला समजून घ्यायचे आहे असेही तिच्या बहिणीने सांगितले. मात्र अशाप्रकारे इतक्या वर्षांनी हरवलेली महिला आपल्या कुटुंबियांना भेटल्याची ही दुर्मिळ घटना असावी.