रेल्वेची आणि विमानाची वेळ कधीच चुकवू नये असे म्हणतात ते चुकीचे नाही. कारण थोडा उशीर झाला तर रेल्वे आणि विमान निघून जाते आणि आपल्या प्रवासाचा पूर्ण विचका होतो. इतकेच नाही तर हजारो रुपये हाकनाक वाया जातात. आपला नियोजित प्रवासाबाबत असे काही झाले तर आपल्याला परिस्थितीचा खूप राग येतो. कधी आपण वेळेत घरातून न निघाल्याने तर, कधी रस्त्यामध्ये ट्राफीक असल्याने आपल्याला विमानतळावर किंवा रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यास उशीर झालेला असतो. एकदा उशीर झाला की कितीही त्रागा करुन काहीच उपयोग होत नाही कारण आपली रेल्वे किंवा विमान निघून गेलेले असते. मग आपण स्वत:ला आणि परिस्थितीला दोष देत राहतो (Woman Punches Emirates Airline Employee After Missing Flight at Mexico City Airport Video Viral).
पण एका महिलेने चक्क या सगळ्याचा राग आपल्या आजुबाजूला उपस्थित असलेल्या लोकांवर काढला. विमान निघून गेल्यानंतर महिलेने जो काही राडा घातला तो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मेक्सिको विमानतळावर अमिराती एअरलाईन्सच्या चेक इन स्टाफवर एका महिलेने हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ही महिला विमानतळावर फेकाफेकी करत असल्याचे दिसते. रागाच्या भरात ही महिला सुटकेस आणि अन्य सामान कर्मचाऱ्यांच्या अंगावर फेकताना दिसते. ही महिला स्वत: विमानतळावर उशीरा आली आणि त्यामुळे तिचे विमान निघून गेले. तसेच या महिलेचा पासपोर्टही एक्स्पायर झाला होता, तरी ती विमानात जाऊ द्यावे म्हणून आग्रह करत होती. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तिला याबाबत माहिती दिली तरी ते ऐकून घेण्याची मनस्थिती नसल्याने या महिलेने याठिकाणी राडा घातला. आता या महिलेला पोहोचायला उशीर झाला आणि तिचा पासपोर्ट एक्स्पायर झाला त्याला कोण काय करणार? ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
पण मानसिक नैराश्यात असलेल्या व्यक्ती किंवा स्वत:वर पुरेसा ताबा नसलेले लोक अशाप्रकारे वागू शकतात. मात्र त्यामुळे एकूण वातावरण खराब होते हे निश्चित. गेल्या काही दिवसांत अशाप्रकारे विमानतळावर राडा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरमध्येही एका अमेरिकन महिलेने केबिन क्रूवर आरडाओरडा केला होता. इतकेच नाही तर या महिलेने आपल्या सोबत असलेल्या प्रवाशांवर पाण्याची बाटली फेकली होती, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता. काही वेळा नशा करुनही विमानात धिंगाणा घालणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.