बाईचं ती शेवटी... पाळण्याच्या दोरीपासून ते ऑफिसच्या अनेक जबाबदाऱ्यांपर्यंत एक हाती सगळं सांभाळते. तिला एकाचवेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात. कधी ती गृहिणी असते, तर कधी नोकरी करणारी वर्किंग वुमन तर कधी बिझनेसवुमन असते. नोकरी किंवा बिझनेस करण्याऱ्या महिलांना एकाचवेळी घरची व ऑफिसची अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. अशा महिलांची रोज दमछाक व तारेवरची कसरत होतच असते. नोकरीसाठीच्या या प्रवासाची सुरुवात होते ती अर्थातच योग्य शिक्षणानं आणि स्वतःचा बायोडेटा तयार करण्यापासून. आताच्या काळात बायोडेटाचं नाव अपडेट होऊन सीव्ही (CV) असं म्हटलं जात. जर बायोडेटाचं नावच इतकं अपडेट असेल तर त्यात असणाऱ्या आपल्या गोष्टी देखील तितक्याच अपडेट असायला हव्यात.
आपण इंटरव्ह्यूला जाताना समोर ठेवलेल्या आपल्या सीव्हीवरूनच आपलं संवाद कौशल्य, आपले शिक्षण, गोष्टी मांडण्याची पद्धत आणि एकंदर आपला स्वभाव या गोष्टी कळत असतात. त्यामुळे CV हा कायमच प्रभावी असणंच अपेक्षित आहे. आपण इंटरव्ह्यूला जाण्याआधी कायम आपला सीव्ही (CV) अपडेट आहे की नाही याची खात्री करुन मगच इंटरव्ह्यूला जातो. सध्या सोशल मीडियावर अशाच एका CV ची चर्चा रंगली आहे. linkedin या संकेतस्थळावर एका गृहिणीनं आपला CV अपडेट केला आहे. linkedin वर एका गृहिणीने तिच्यासंदर्भातील माहिती, कामाचा अनुभव वगैरे माहिती देत तिचा CV अपलोड केला आहे, पण नेमकं तिने यात असे काय अपडेट केले आहे की तो CV चक्क चर्चेचा विषय ठरला आहे, हे पाहूयात(Woman's CV With 13 Years of Experience as 'Homemaker' Goes Viral on LinkedIn, Internet Reacts).
एका गृहिणीने चक्क आपल्या CV मध्ये अपडेट केली ही माहिती...
नोकरीसाठी अर्ज करताना या महिलेने आपण १३ वर्षांचा ब्रेक घेतल्याचे नमूद केले आहे. पण हे नमूद करताना तिने या १३ वर्षांच्या काळात केलेल्या कामांचा म्हणजेच अगदी घरातील दैनंदिन कामांचा देखील न लाजता अगदी बिनधास्तपणे उल्लेख केला आहे. Housewife असणाऱ्या आणि सध्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या या महिलेनं तिच्या CV मध्ये लिहिलं, '२००९ पासून आतापर्यंत मी होममेकर आहे.' असं लिहिताना आपल्या जबाबदाऱ्यांविषयी तिने लिहिले , 'दैनंदिन कामं योग्य वेळेत पूर्ण करणं. गेल्या काही काळापासून जवळपास एकटीनंच घरातील सर्व जबबादाऱ्या पार पाडणं, दोन्ही मुलांच्या जन्मापासून त्यांच्यासाठी कायम हजर राहणं, त्यांना गृहपाठ, शालेय प्रकल्पात मदत करणं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करणं'. अशा अनेक कामांची यादी तिने आपल्या CV मध्ये अपडेट केलेली दिसत आहेत. 'ग्रोथिक' या कंटेंट मार्केटिंग कंपनीच्या संस्थापकपदी असणाऱ्या युगांश चोक्रा यांनी या महिलेचा सीव्ही सोशल मीडियावर शेअर केला.
उत्तरप्रदेशात बायका म्हणाल्या आता बास ! 'ग्रीन आर्मी' शिकवतेय बायकांना छळणाऱ्यांना धडा...
घसघशीत पगार, कार्पोरेट जॉब, ब्राइट करिअर ‘तिनं’ सोडलं आणि.. करिअरचं वाटोळं झालं की भलं?
आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर आता या महिलेने नोकरीच्या शोधासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. तिच्याविषयीची ही माहिती कमालीची चर्चेत आली असून, सध्या सर्वदूर तिच्या प्रामाणिकपणाच कौतुक होताना दिसत आहे. ज्यामुळे ही महिलाच नव्हे, तर सर्वच गृहिणी खऱ्या अर्थाने 'सुपरवुमन' आहेत हे पुन्हा एकदा सर्वांनाच पटलं आहे.
हा सीव्ही (CV) पाहून नेटकरी म्हणतात...
या महिलेला कामाचा तब्बल १३ वर्षांचा अनुभव आहे. गृहिणी म्हणून का असेना, पण तिचा अनुभव मात्र विचारात घेण्यायोग्य आहे', अशा प्रतिक्रिया हा सीव्ही वाचून अनेकांनीच दिल्या आहेत. अनेकांनी कितीही दुर्लक्ष केलं तरीही कुटुंबाची काळजी घेणं हे सुद्धा जबाबदारीचं आणि कठीण काम असल्याची प्रतिक्रिया काही बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी दिल्या आहेत.