Join us  

कबड्डी..कबड्डी..डोक्यावर पदर आणि गावरान हिसका, पाहा आयाबायांच्या कबड्डीचा जबरदस्त सामना, व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 12:58 PM

Women Kabaddi Game Wearing Saree Chhattisgarh Olympic Viral Video : या सामन्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्देपदर डोक्यावर घेऊन तो कंबरेशी खोचून अतिशय उत्साहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.   हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.

कबड्डी म्हटले की टिशर्ट आणि शॉर्ट पँट घातलेले तरुण किंवा तरुणी असे चित्र सामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मैदानात कबड्डी...कबड्डीचा घोष आणि दुसरीकडे स्पर्धेची इर्शा असे चित्र पाहायला मिळते. लहानपणापासून शाळेत खेळत असलेला हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे महिलाही आता यामध्ये मागे नाहीत. प्रसंगी साडी नेसून डोक्यावर पदर घेत महिला कबड्डीच्या मैदानात उतरतात आणि त्यांचा हा सामना जबरदस्त रंगतो. विशेष म्हणजे त्यांच्या या सामन्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे (Women Kabaddi Game Wearing Saree Chhattisgarh Olympic Viral Video). 

(Image : Google)

गावाकडच्या बायका म्हणजे एकतर शेतात राबणाऱ्या किंवा डोक्यावरुन पाणी वाहून नेणाऱ्या, नदीकाठी कपडे धुवत असलेल्या किंवा घरात रांधत असलेल्या असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मात्र या सगळ्याला फाटा देत गावाकडच्या महिला कबड्डीच्या मैदानात रमल्याचे पाहायला मिळाले. या महिलांचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर त्यांचे बरेच कौतुक होत आहे. हा व्हिडिओ छत्तीसगड ऑलिम्पिकचा असून स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी केले. ६ ऑक्टोबरपासून सुरू झालेली ही ऑलिम्पिक स्पर्धा ६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रसिद्ध सनदी अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अवनीश शरण कायम आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून काही ना काही शेअर करत असतात, हा व्हिडिओ त्यापैकीच एक आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना ते म्हणतात, ‘हम किसीसे कम है क्या!!!’ हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत. पदर डोक्यावर घेऊन तो कंबरेशी खोचून अतिशय उत्साहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकबड्डी