पावसाळ्याच्या दिवसांत दमट हवामानामुळे घर ओलसर राहते. त्यामुळे कुबट वास येणे, मुंग्या किंवा झुरळांचे प्रमाण वाढणे, ओलावा राहिल्याने घर दमट वाटणे किंवा फर्निचरला वाळवी लागणे असे प्रकार होतात. वाळवी एकदा लागली की ती लवकर जात नाही आणि मग ती भिंतीमध्ये, फर्निचरमध्ये रुतून बसते आणि सगळे घर आणि फर्निचर पोखरायला लागते. एकदा हे खराब व्हायला लागले की मग फर्निचर तर पूर्ण वाया जाते. भिंतीतही ही वाळवी अतिशय वेगाने पसरते. हे किडे पाहून अनेकदा आपल्याला घाणही वाटते (Know How To Remove Termites From Wood Easy Home Remedy).
स्वयंपाकघराच्या ठिकाणी ही वाळवी असेल तर आरोग्यासाठीही ती अतिशय धोकादायक असते. वाळवी लागली की आपण एकतर पेस्ट कंट्रोलवाल्यांना बोलवतो नाहीतर आणखी काहीतरी महागडे उपाय करतो. पण असे करायची काहीच गरज नसते. घरच्या घरी सोप्या उपायाने ही वाळवी आपण सहज घालवू शकतो. साधारणपणे अंधार किंवा ओलावा असलेल्या ठिकाणी वाळवी पटकन वाढते. त्यामुळे घरात जास्तीत जास्त सूर्यप्रकाश येईल आणि हवा खेळती राहील असे पाहायला हवे. उष्णता लागली की वाळवीचा नायनाट होतो. ही वाळवी घालवून आपले घर स्वच्छ आणि चांगले ठेवण्यासाठी नेमके काय करायचे पाहूया...
१. एका बाऊलमध्ये २ चमचे व्हाईट व्हिनेगर घ्या आणि त्यात २ चमचे लिंबाचा रस मिसळा.
२. हे मिश्रण एका बाटलीत भरा आणि ज्याठिकाणी वाळवी लागली आहे त्याठिकाणी ते स्प्रे करा, स्प्रे नसेल तर कापडाने लावले किंवा शिंपडले तरी चालते. मात्र स्प्रे असेल तर ते सगळीकडे चांगल्यारितीने पसरले जाते.
३. साधारणपणे हे मिश्रण लाकडी फर्निचरवर शिंपडल्यानंतर साधारण अर्धा तास तसेच ठेवा. त्यानंतर एका फडक्याने किंवा गॉजने फर्निचरचा हा भार साफ करुन घ्या.
४. कमीत कमी गोष्टींचा वापर करुन करता येणारा हा सोपा उपाय केल्यास अगदी काही मिनीटांत हे वाळवीचे किडे गायब व्हायला मदत होईल.