सोशल मीडियावर दररोज विविध गोष्टी व्हायरल होत असतात. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. एका वर्किंग वुमनने तिला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं. तिच्या सासरची मंडळी घरात स्वयंपाकासाठी कूक असूनही नेहमी तिलाच स्वयंपाक करायला सांगतात. तिने जेवण बनवायला हवं म्हणून ते कूकला सुट्टी देतात. यावर महिलेला आता राग अनावर झाला आहे.
रेडिटवर महिलेने आपली व्यथा मांडली आहे. महिलेचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं आहे आणि ती वर्किंग असून उत्तम कमावते. तिने सांगितलं की, तिचे सासू-सासरे तिच्यासोबत राहत नाहीत पण ते अनेकदा तिला भेटायला येत असतात. सासू-सासरे तिला प्रत्येक वेळी स्वयंपाक करायला सांगतात. घरामध्ये पैसे देऊन कूक ठेवलेला असतानाही फक्त तिचे सासू-सासरेच नाही तर इतर नातेवाईकही तिला स्वयंपाक करायला सांगतात.
एक दिवस परिस्थिती बिघडली जेव्हा महिलेचे सासरे म्हणाले की, "मला एक दिवस तुमच्या कूकला सुट्टी द्यायची आहे आणि तू स्वयंपाक बनव." यावर महिला म्हणाली, मी फक्त हसले आणि नाही म्हणाले. नंतर माझ्या खोलीत आले. BetterEveryday36 नावाच्या हँडलवरून आपल्या घरातील समस्या सांगणाऱ्या महिलेने नंतर रेडिटर्सनाच ती जास्त रिएक्ट करत आहे का? असा प्रश्न विचारला.
महिलेची ही पोस्ट लवकरच जोरदार व्हायरल झाली आणि अनेक रेडिटर्सनी तिला तिच्या सासरच्या लोकांशी कसं वागायचं हे सुचवलं आहे. तसेच तिच्या पतीच्या भूमिकेबद्दल विचारलं. यावर महिलेने उत्तर दिलं की तिच्या पतीने आधीच तिच्या सासरच्या लोकांना अशा मागण्या करू नये असं सांगितलं होतं परंतु त्यांनी त्याचंही काही ऐकलं नाही. एका रेडिटरने महिलेला स्वतःसाठी स्टँड घेण्यास सांगितलं आहे.
“तुमच्या सासरच्या लोकांसाठी तुम्ही आधीच एक खलनायिका (Vamp) आहात, म्हणून स्वतःसाठी एक स्टँड घ्या आणि त्यांना वाटतंय तशीच खलनायिका व्हा. पुढच्या वेळी जेव्हा ते असं म्हणतील तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, जर तुम्हाला स्वयंपाक करण्यात एवढा रस असेल तर मी कूकला तुम्ही इथे असेपर्यंत सुट्टी घ्यायला सांगते म्हणजे तुम्ही स्वयंपाक करू शकता" असं रेडिटरने सांगितलं आहे.
रेडिटरपैकी एकाने महिलेच्या समस्येवर एक डेंजर उपाय शोधून काढला. "झोमॅटो/स्विगी वरून काही भारतीय पदार्थ ऑर्डर करा. त्यात जास्त मीठ आणि मिरची घाला आणि चांगलं मिक्स करा. वरून कोथिंबीर घालून सजवा आणि त्यांना प्रेमाने सर्व्ह करा. यानंतर ते तुम्हाला पुन्हा कधीही स्वयंपाक करायला सांगणार नाहीत" असं म्हटलं आहे.