इंटरनेट ही सध्या अशी गोष्ट झाली आहे की जिथे तुम्हाला दिवसागणिक एकाहून एक भन्नाट प्रकार पाहायला मिळतात. जगाच्या कोणत्याही टोकावर एखाद्या व्यक्तीने केलेले धाडस असो किंवा सादर केलेली छानशी कला. हातातल्या मोबाइलवर आपण हे सगळे अगदी सहज पाहू शकतो. नुकताच एका आजीने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर डान्सिंग दीदी म्हणून ओळख असलेल्या 63 वर्षांच्या रवी बाला शर्मा यांनी केलेल्या डान्सचे व्हिडिओ कदाचित तुम्ही आधी पाहिले असतील. या वयातही त्यांच्यातील उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा असतो. आताही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी डान्स नाही तर मस्त गाणे गायले आहे. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैश्शा या चित्रपटातील मोह मोह के धागे हे गाणे त्या म्हणत आहेत. वरुण ग्रोवर यांनी या गाण्याचे बोल लिहीले असून अनु मलिक यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. अभिनेता आयुशमान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. रवी बाला यांचा आवाज ऐकून आपल्याला छान तर वाटतेच पण आपल्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल येते.
हे मूळ गाणे गायिका मोनाली ठाकूर हिने गायले असून त्याचा अर्थही अतिशय सुंदर आहे. रवी बाला यांनी हे गाणे गाताना चंदेरी आणि सोनेरी कॉम्बिनेशन असलेली सुंदर साडी नेसली असून आपले पांढरे लांबसडक केस मोकळे सोडले आहेत. त्यांच्या या लूकमुळे त्यांचे वय इतके असेल असे वाटत नाही. अतिशय मनापासून गाणे म्हणत असताना त्यांच्या चेहऱ्यावरही एक छानसे स्माईल असल्याचे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते. इतकेच नाही तर त्यांचा आवाजही अतिशय मधुर असून त्यांनी गायलेल्या गाण्याच्या आपण नक्कीच प्रेमात पडतो. त्यांच्या या गाण्याच्या सादरीकरणाने नेटीझन्सनी त्यांचे भरपूर कौतुक केले आहे. रवी बाला यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याबरोबरच रवी बाला यांच्या मल्टीटॅलेंटचे भरभरुन कौतुक होताना दिसत आहे.
त्यांनी लहानपणी आपल्या वडीलांकडून संगीत आणि तबल्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे वडील संगीत शिक्षक आणि तबला वादक होते. तसेच लहानपणी त्यांनी कथकचेही प्रशिक्षण घेतले होते. आपल्या पतीची इच्छा होती की आपण नृत्य करावे. मात्र काही कारणांनी ते कायम मागे पडले. पण पतीच्या निधनानंतर त्यांच्या परिवारातील लोकांनी त्यांना डान्स करण्यासाठी आणि जीवन आनंदात जगण्यासाठी प्रोत्साहन दिले. तेव्हापासून त्या आपले डान्सचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. याआधी त्यांच्या हार्डी संधूच्या बिजली बिजली गाण्याचा, तसेच सारा अली खानच्या चका चक गाण्यवरील डान्सचे व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केले होते आणि त्याला नेटीझन्सनी भरपूर पसंती दर्शवली होती.