Join us  

तू काळी आहेस.. अशी का दिसते?- मसाबा गुप्ता सांगते, गोरं नसल्याने झालेला भयंकर त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2022 1:11 PM

Social Viral: गोऱ्या रंगाचं एवढं गारूड आपल्या समाजावर होतं आणि आहे की अगदी शाळेत असतानाही मला ते जाणवायचं... म्हणूनच तर मग मलाही आपण उजळ दिसावं असं वाटायचं... फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता (Masaba Gupta) सांगतेय तिची गोष्ट...

ठळक मुद्देएवढ्या लहान वयात तिच्या मनात असे विचार आले आणि त्यामुळे तिने जे काही केले, त्यावरून समाजाच्या मनावर रंगाचा पगडा किती गडद आहे, हे दिसून येते.

नाकी- डोळी फार देखणी नसेल तरी चालेल, पण रंग मात्र गोरा हवा... अशी अपेक्षा आजही मुलींकडून केली जाते. गोऱ्यापान मुली देखण्या आणि काळ्या- सावळ्या मुली ठिकठाक... असं समाजाने जणू वर्गीकरणच करून टाकलं आहे. त्यामुळे काळ्या- सावळ्या, गहूवर्णीय मुलींनी कधी ना कधी स्वत:च्या वर्णाबाबत कॉम्प्लेक्स (complex about her dark colour) अनुभवलेलाच असतो. बरं वयात आल्यावर किंवा मोठं झाल्यावरच या गोष्टी उमजू लागतात असं नाही. अगदी लहान वयातच पालकांच्या किंवा इतर कुणा मोठ्या व्यक्तींच्या बोलण्यातून, मालिका- सिनेमे पाहून हा वर्णभेद जाणवू लागतो आणि मग त्यांनाही आपण उजळ व्हावं असं वाटू लागतं.. अशीच स्वत:ची कहाणी सांगितली आहे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिने. 

 

मसाबा गुप्ता म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि क्रिकेटर व्हिव्हियन रिचर्ड ( Vivian Richards) यांची कन्या. अनुवंशिकतेने वडीलांचा रंग मसाबामध्ये आला आणि याचा रंगाचा तिला शाळेत असताना कॉम्प्लेक्स वाटू लागायचा. कारण सावळ्या रंगावरून तिला शालेय मित्रमैत्रिणींचे टोमणे ऐकावे लागायचे. त्यामुळे मग आपणही इतर मुलींप्रमाणे उजळ दिसावं म्हणून छोट्याशा मसाबाने एके दिवशी शाळेत जाताना एक वेगळाच प्रयोग केला. फाउंडेशन लावलं की आईचा चेहरा थोडा उजळ दिसतो, हे तिने पाहिलेलं होतं. त्यामुळे मग तिनेही शाळेत जाताना फाउंडेशन लावून जाण्याचं ठरवलं. 

 

त्याप्रमाणे एके दिवशी तिने फाउंडेशन लावलं आणि ती शाळेत गेली. पण शाळेत गेल्यावर प्रत्येक जण तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघू लागला. कारण ते फाउंडेशन तिच्या चेहऱ्यावर अतिशय विचित्र पद्धतीने लावल्या गेलं होतं.. तिच्या चेहऱ्यावर फाउंडेशनचे पांढरे डाग दिसू लागले होते. यामुळे ती सगळ्यांसमोर आणखीनच खजील झाली. मसाबा म्हणते मी बाथरूममध्ये जाऊन चेहऱ्यावर फाउंडेशन तर लावलं पण ते ही अंधारातच. माझ्या बाथरूममध्ये मी नेहमी अंधारच ठेवायचे कारण मला माझी त्वचा दिसायला नको असायची.. त्वचेच्या वर्णाबाबत एवढ्या लहान वयात तिच्या मनात असे विचार आले आणि त्यामुळे तिने जे काही केले, त्यावरून समाजाच्या मनावर रंगाचा पगडा किती गडद आहे, हे दिसून येते. अगदी शाळेत जाणारे निरागस लहान मुलही त्यातून सुटलेले नाही, हेच खरे. 

 

मी अशी का दिसते, माझे ओठ जाड का, केस असे का, रंग असा का.... यावरून मला शाळेत एवढं हिणवलं जायचं की मी मग हळूहळू मलाही मी अजिबातच आवडायचे नाही. माझा रंग, माझं दिसणं या सगळ्या गोष्टींचा मला राग यायचा, असंही मसाबा सांगते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलनीना गुप्तासेलिब्रिटीब्यूटी टिप्स