सोशल मीडियावर कायम काही ना काही व्हायरल होत असते. कधी एखादी प्रेमळ गोष्ट तर कधी गमतीशीर घटना, कधी हिंसकतेचे उदाहरण तर कधी भावनिक काही. हे फोटो किंवा व्हिडिओ पाहून आपणही नकळत आपल्या भावना व्यक्त करतो. प्रत्यक्षात एखादी घटना कुठे, कशी केव्हा घडली याबाबत आपल्याला पुरेशा माहिती मिळतेच असेही नाही. मात्र ते पाहून आपण भावूक होतोच. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये एक तरुणी एका फूड डीलिव्हरी बॉयला मारताना दिसत आहे. इतकेच नाही तर सुरुवातीला ही मुलगी त्याच्याकडून ऑर्डर केलेले फूड हिसकावून घेते आणि नंतर त्याला आपल्या चपलेने मारते. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असल्याने ती काही वेळात सोशल मीडियावर व्हायरल होते आणि नेटीझन्स त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देतात (Zomato Delivery Boy Beaten by Woman with Shoe Viral Video).
झोमॅटोचा शर्ट घातलेला डीलिव्हरी बॉय आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. म्हणजेच या तरुणीने झोमॅटोवरुन काहीतरी मागवेल असल्याचे स्पष्ट होते. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ज्या व्यक्तीने ऑर्डर दिली होती त्याने झोमॅटो कंपनीला टॅग करुन लिहीले आहे की माझी ऑर्डर देत असताना झोमॅटोच्या रिप्रेझेंटेटीव्हला मारहाण करण्यात आली आहे. एका तरुणीने त्याला मारहाण केली असून ऑर्डरही त्याच्याकडून हिसकावून घेतली आहे. हा व्यक्ती आपल्या घरी आला आणि आपली नोकरी जाणार या भितीने त्याला रडायला आले असे या व्यक्तीने पोस्टमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ही तरुणी अतिशय वाईट पद्धतीने या झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारताना दिसत आहे.
आपल्या ऑर्डरपेक्षा या डिलिव्हरी बॉयची नोकरी आणि त्याची सुरक्षा जास्त महत्त्वाचे असल्याचे या तक्रार करणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. त्याने झोमॅटोच्या कस्टमर केअरशीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच ट्विटरवर झोमॅटोला टॅग करुन त्यांच्या कर्मचाऱ्याच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे कंपनीने या व्यक्तीला रिप्लाय दिला असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत असे सांगितले. ४५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला असून सदर तरुणीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. मात्र ही तरुणी डिलिव्हरी बॉयला का मारत होती आणि तिने त्याच्या हातातली ऑर्डर का हिसकावून घेतली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.