थंडी पडायला लागली की कपाटातले स्वेटर बाहेर निघतात. शेकोटीवर शेकणं सुरु होतं. शरीर गरम ठेवण्यासाठी ऊबदार पर्याय शोधायची खटखट आपली सुरु असते. पण थंडीच्या काळात शरीर केवळ बाहेरुन गरम करुन चालत नाही तर शरीराला आतूनही उब मिळणं आवश्यक असतं. म्हणूनच थंडीत उबदार , गरम प्रकृतीचे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. या पदार्थांनी थंडीमुळे आरोग्य तर राखलं जातंच पण वजनही वाढतं. पण वजन वाढू न देता थंडीत शरीराला उबदार ठेवण्यासोबतच आरोग्यास विविध फायदे देणारं बाजरीच्या पिठाचं सूप पिणं हे लाभदायक असतं. पूर्वीच्या काळी बाजरीचा घाटा केला जायचा. अजूनही ग्रामीण भागात हा घाटा आवडीनं नाश्त्याला पिला जातो. बाजरीचं सूपही बाजरीच्या घाटयाइतकंच पोषक असतं.
Image: Google
थंडीत बाजरीचं सूप प्यावं कारण.
1. बाजरीचं सूप पचनास मदत करतं शिवाय यात न विरघळू शकणारे फायबर असतात. हे फायबर पोटात जाऊन पचनास मदत करणारे विकर निर्माण करण्यास सहाय्यक ठरणार्या प्रोबायोटिकसारखे काम करतात. तसेच बाजरीच्या सुपातील या फायबरमुळे लवकर भूक लागत नाही.
2. बाजरीच्या सुपातील न विरघळू शकणारे फायबर आणि हळूहळू पचणारे स्टार्च यामुळे हे सूप पिल्यानं रक्तातील साखर लगेच वाढत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच मधुमेहाच्या आजारातही हे सूप उपयुक्त ठरतं.
3. बाजरीत गुंतागुंतीचं कबरेदकं असतात. त्यामुळे ते हळूहळू पचतात. यामुळे बाजरीचं सूप पितो तेव्हा पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि पोटही दीर्घकाळ भरलेलं राहातं. हे सूप पिऊन शरीरात ऊर्जा निर्माण होते.
4. बाजरीच्या सूपमधून शरीरास आवश्यक असा ओमेगा 3 हे फॅटी अँसिड मिळतं. हदय निरोगी आणि सुरक्षित राहाण्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा असतो.5. लोह ,फॉस्फरस हे महत्त्वाचे घटक बाजरीच्या सूपमधून मिळतात. यामुळे शरीरातील रक्त वाढतं. शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन कार्बन डाय ऑक्साइड वाढून पेशींचं होणारं नुकसान टाळलं जातं. थंडीत नियमित वाटीभर बाजरीचं सूप घेतल्यास स्मरणशक्ती आणि ऊर्जा वाढते.
Image: Google
बाजरीचं सूप कसं करायचं?
बाजरीचं सूप जितकं पौष्टिक आणि चवदार आहे तितकंच ते बनवायला खूप सोपं आणि झटपट होणारं आहे. बाजरीचं सूप करण्यासाठी 2 चमचे बाजरीचं पीठ, अर्धा कप दही, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा आल्याची पेस्ट, 4 लसूण पाकळ्यांची पेस्ट, कढीपत्ता 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमूटभर मिरेपूड, एक चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, थोडी हळद, 1 चमचा जिरे, एक ते दिड चमचा तूप किंवा बटर आणि 2 वाट्या पाणी एवढं जिन्नस घ्यावं.
सर्वात आधी कढईत थोडं तूप किंवा बटर ( शक्यतो साजूक तूपच घ्यावं) घालून बाजरीचं पीठ खमंग भाजून घ्यावं. मग ते एका भांड्यात काढावं. एका भांड्यात दही घेऊन त्यात पाणी घालून ते फेटून घ्यावं. बाजरीचं पीठ गार झाल्यावर दह्यात मिसळून घ्यावं. गुठळी राहू नये इतपत ते नीट मिसळावं. कढईत पुन्हा थोडं तूप घालून जिरे, कढीपत्ता, हळद, हिंग घालावं. ते चांगलं परतून घ्यावं. मिरचीचे तुकडे घालावेत. नंतर कांदा परतून घ्यावा. कांदा परतला गेला की आल्याची, लसणाची पेस्ट घालून ती परतून घ्यावी. नंतर दही बाजरीच मिश्रण त्यात घालावं. मंद आचेवर त्याला चांगल्या दोन तीन उकळ्या फुटू द्याव्यात. चवीनुसार मीठ घालून सूप चांगलं हलवावं. पुन्हा दोन तीन उकळ्या काढून गॅस बंद करावा. हे सूप गरम गरम प्यावं.