आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक हंगामात बाजार मिळणाऱ्या स्थानिक भाजी फळांचा आहारात भरपूर आणि वेगवेगळ्या पध्दतीने उपयोग केल्यास आपल्याला दवाखाना आणि मेडिकलमधे चकरा माराव्या लागत नाही. आहराचा विचार औषधाच्या रुपाने करायचा झाल्यास चविष्ट आणि पौष्टिक पर्याय भरपूर आहेत.
शरीरातील विषारी घटक बाहेर पडणं, सोबत शरीराला आवश्यक प्रथिनं, जीवनसत्त्वं , खनिजं आणि ॲण्टिऑक्सिडण्टसचा पुरवठा करण्यासाठी भाज्या, फळं आणि सुकामेवा यांचा वापर करुन तयार केलेल्या स्मूदी खूप महत्त्वपूर्ण असतात. चांगलं आरोग्य, सुंदर त्वचा, सुडौल बांधा यासाठी आठवड्यातून किमान दोन वेळा तरी स्मूदी सकाळच्या आहारात घ्यायला हवी असं आहारतज्ज्ञ सांगतात.
Image: Google
स्मूदीचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकार काही समान फायद्यांसोबतच विशिष्ट फायदेदेखील देतात. हिवाळ्यात प्रामुख्याने हिरवे मटार बाजारात खूप असतात. या मटारचा उपयोग आपण चविष्ट व्यंजनं तयार करण्यासाठी करतोच. पण हेच मटार आपलं वजन कमी करण्यासाठी, शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकून चयापचय क्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी या मटारांचा उपयोग स्मूदीच्या रुपात करायला हवा. मटारची हिरवीगार, पोषणमुल्यांनी समृध्द आणि उत्तम चवीची स्मूदी तयार करता येते. मटारची स्मूदी वेगन डाएटचा नियम पाळणाऱ्यांसाठीही उपयुक्त ठरते. मटारची स्मूदी तयार करण्याचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार ताजे मटार वापरुन करता येते आणि दुसऱ्या प्रकारच्या मटार स्मूदीसाठी फ्रोझन मटारचा उपयोग केला जातो.
Image: Google
ताज्या मटारची स्मूदी
ताज्या मटारची स्मूदी करायची म्हणजे वाटाणे कच्चे वापरायचे असं नाही. ताज्या मटारमधील कच्चे वाटाणे तसेच सेवन करणं हे पचनाच्या दृष्टिकोनातून योग्य नसतं. ताज्या मटारची स्मूदी करण्यासाठी ताजे मटार सोलून त्याचे दाणे काढावेत. हे दाणे उन्हात आधी व्यवस्थित वाळवावेत. मटार दाणे उन्हात छान सुकले की मग मिक्सरमधून त्याची बारीक पावडर तयार करुन घ्यावी. मटारची या प्रकारे बनवलेली पावडर म्हणजे होममेड प्रोटीन पावडरच आहे. स्मूदी करण्यासाठी एक ग्लास पाणी घ्यावं. त्यासाठी 2 चमचे मटार दाण्यांची पावडर घ्यावी. ही पावडर पाण्यात व्यवस्थित मिक्स करावी. एक आवडतं फळ घ्यावं. केळ किंवा सफरचंद घेतलं तरी चालतं. त्याचे बारीक तुकडे करावेत. मटार पावडर मिसळलेलं पाणी कापलेलं फळ, 3-4 बदाम आणि एक चमचा मध घ्यावं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यातून किंवा ब्लेण्डरनं वाटून घ्यावं. झटक्यात पौष्टिक स्मूदी तयार होते.
Image: Google
पध्दत दुसरी
हिरव्या मटारची स्मूदी करण्याची दुसरी पध्दतही सोपी आणि पटकन होणारी आहे. यासाठी हिरवे मटार वाळवून घेण्याऐवजी फ्रोझन मटारचा उपयोग केला जातो. कारण एकच कच्चे मटार सेवन कर नये म्हणून.
फ्रोझन मटारची स्मूदी तयार करण्यासाठी अर्धा कप फ्रोझन मटार दाणे, 1 केळ, 1 कप पालकाची कोवळी हिरवीगार पानं, 4-5 पुदिन्याची पानं, दिड कप बदामाचं दूध किंवा वेगन पर्याय म्हणून सोया दूध किंवा नारळाचं दूध घ्यावं. दुधाचं प्रमाण कमी घेतल्यास थोडं पाणी घालावं.
Image: Google
सर्व घटक एकत्र करुन मिक्सरमधून किंवा ब्लेण्डरमधून एकदम मऊसर वाटून घ्यावं. साधारणत: एका मिनिटात आपल्या हवं तसं मिश्रण तयार होतं. जर स्मूदी खूप घट्ट वाटत असेल तर त्यात थोडं दूध/ पाणी घालावं. या स्मूदीत मुळातच फ्रोझन मटार वापरलेले असल्यानं स्मूदी पिताना वरुन बर्फ घालण्याची गरज नसते. शिवाय या फ्रोझन मटारमध्ये गोडवाही असतो. केळ आणि बदाम/ सोया/ नारळ दुधाचा गोडवाही या स्मूदीत उतरतो. त्यामुळे गोडव्यासाठी मध टाकण्याची गरज नसते. या स्मूदीत पुदिन्याची पानं घातल्यानं स्मूदीला फ्रेश स्वाद आणि गंध येतो. पालकामुळे या प्रथिनंयुक्त स्मूदीतून खनिजं आणि जीवनसत्त्वंही मिळतात. या स्मूदीतून शरीराला आरोग्यदायी फॅटस मिळण्यासाठी या स्मूदीत एक्खादा चमचा पीनट बटर किंवा बदाम बटर टाकू शकता.
Image: Google
मटार स्मूदीचे फायदे
दोन्ही पध्दतीपैकी कोणत्याही पद्धतीने स्मूदी घेतल्यास आरोग्यास फायदाच होतो.
1. मटारची स्मूदी पिल्याने शरीरात आवश्यक प्रथिनं मिळतात. कारण मटारमधे प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं.
2. मटारच्या स्मुदीतून शरीरास प्रथिनांसोबतच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक, लोहही खनिजं फोलेट सारखा आरोग्यास महत्त्वपूर्ण घटक, क आणि ब जीवनसत्त्वं मिळतात.
3. मटार स्मूदी पिल्यानं हाडं मजबूत होतात.
4. या स्मुदीतून शरीरात पुरेशा प्रमाणात फायबर जातं, त्याचा उपयोग शरीर आतून शुध्द होण्यास, चयापचय क्रियेचा वेग वाढण्यास होतो. म्हणूनच ही स्मूदी आरोग्य कमावण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाची असते.
5. पचनक्रियेशी निगडित समस्या दूर होवून पचन व्यवस्था सुधारण्याचं कामही या एक ग्लास मटार स्मूदीतून होतं.