Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उत्तम आरोग्यासाठी प्या तुळशीचा गरमागरम चहा, तुळस घालून चहा करण्याच्या ३ पद्धती- आजार राहतील लांब

उत्तम आरोग्यासाठी प्या तुळशीचा गरमागरम चहा, तुळस घालून चहा करण्याच्या ३ पद्धती- आजार राहतील लांब

तुळशीचा आरोग्यदायी चहा ( basil tea) प्यायल्यानं सर्दी खोकल्यासारख्या छोट्या आजारांपासून कॅन्सरपर्यंतच्या मोठ्या आजारांचा धोका कमी होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2022 09:00 AM2022-08-31T09:00:16+5:302022-08-31T09:05:01+5:30

तुळशीचा आरोग्यदायी चहा ( basil tea) प्यायल्यानं सर्दी खोकल्यासारख्या छोट्या आजारांपासून कॅन्सरपर्यंतच्या मोठ्या आजारांचा धोका कमी होतो.

10 benefits of drinking Basil Tea. | उत्तम आरोग्यासाठी प्या तुळशीचा गरमागरम चहा, तुळस घालून चहा करण्याच्या ३ पद्धती- आजार राहतील लांब

उत्तम आरोग्यासाठी प्या तुळशीचा गरमागरम चहा, तुळस घालून चहा करण्याच्या ३ पद्धती- आजार राहतील लांब

Highlightsदमा आणि फुप्फुसांशी निगडित विकारातही तुळशीचा चहा प्यायल्यानं फायदा होतो.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचच्या चहाचा उपयोग होतो.त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी तुळशीचा चहा नियमित प्यावा.

आयुर्वेदात तुळशीला (basil benefits to health) खूप महत्व आहे. शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपचार करताना तुळशीचा वापर केला जातो. आपल्या घरातल्या छोट्याशा कुंडीत बहरलेली तुळस आपलं अनेक आजारांपासून संरक्षण करु शकते. यासाठी तुळशीचा चहा (basil tea)  प्यायला हवा. तुळशीचा आरोग्यदायी चहा प्यायल्यानं ( drink basil tea to avoid diseases) सर्दी खोकल्यासारख्या छोट्या आजारांपासून कॅन्सरपर्यंतच्या मोठ्या  आजारांचा धोका कमी होतो. 

तुळशीचा चहा करताना प्रामुख्यानं तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो. तुळशीच्या पानांमध्ये जिवाणुविरोधी, विषाणुविरोधी, बुरशीविरोधी, सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात. तसेच तुळशीमध्ये अ,क ही जीवनसत्वं, कॅल्शियम आणि फाॅस्फरस हे आरोग्यास फायदेशीर घटकही असतात.  तुळशीमधल्या या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे अनेक आरोग्यसमस्येत तुळशीचा फायदा होतो.

Image: Google

तुळशीचा चहा प्यावा कारण..

1. नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फॉरमेशन 'च्या वेबसाइटवर प्रसिध्द झालेल्या वैज्ञानिक शोधानुसार तुळशीच्या सेवनामुळे छातीतला कफ पातळ होवून बाहेर निघण्यास मदत होते. दमा आणि फुप्फुसांशी निगडित विकारातही तुळशीचा चहा प्यायल्यानं फायदा होतो. तुळशीचा चहा प्यायल्यानं श्वसन प्रणाली सुरळीत चालते. 

2. तुळशीच्या पानांमध्ये ताणविरोधी गुणधर्म असतात. तुळशीचा चहा प्यायल्यानं शरीर आणि मनावरचा ताण कमी होवून मूडही छान होतो. 

3.  तुळशीमध्ये जिवाणुविरोधी आणि किटाणुविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे मौखिक आरोग्य जपण्यासाठी तुळशीच्या चहाचा फायदा होतो. तुळशीचा चहा प्यायल्यानं तोंडात हानिकारक जिवाणुंची वाढ रोखली जाते. 

4. तुळशीच्या पानामध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर असतं. वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तुळशीचच्या चहाचा उपयोग होतो. 

5. तुळशीचा चहा प्यायल्यानं पचन क्रिया सुधारते.  पचनाशी निगडित गॅसेस, जुलाब, बध्दकोष्ठता , पोटात चमका येणं, मळमळणं, उलट्या होणं या समस्या कमी होतात. पोट साफ होण्यासाठीही तुळशीचा चहाचा उपयोग होतो. 

6. तुळसीमध्ये ॲण्टि स्ट्रेस, ॲण्टि एंग्जायटी आणि ॲण्टि डिप्रेशन हे गुणधर्म असतात.  तुळशीचा चहा प्यायल्यानं डोकं शांत होवून झोप चांगली लागण्यास मदत होते. 

7. तुळशीचा चहा नियमित प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. अर्थात तुळशीच्या चहाला नियमित व्यायामाचीही गरज असते. 

8. तुळशीच्या पानांमध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट्स गुणधर्म असतात. तुळशीचा चहा प्यायल्यानं त्वचा तरुण दिसते. जिवाणुविरोधी गुणधर्मांमुळे त्वचेशी निगडित समस्याही दूर होतात. 

9. केस गळती थांबवण्यासाठी, केस वाढण्यासाठी तुळशीचा चहाचा उपयोग होतो. तुळशीच्या चहानं केस धुतल्यानेही केस निरोगी राहाण्यास मदत होते. 

10 . तुळशीच्या पानांमधील गुणधर्म कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास प्रभावी ठरतात. कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या दिनक्रमात तुळशीच्या चहाचा समावेश करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. 

Image: Google

तुळशीचा चहा कसा करावा?

केवळ तुळशीच्या पानांचा चहा, लिंबू घालून तुळशीचा चहा आणि आलं घालून तुळशीचा चहा अशा तीन पध्दतीनं तुळशीचा चहा तयार करता येतो. 

तुळशीच्या पानांचा चहा

तुळशीच्या पानांचा चहा करण्यासाठी सात आठ तुळशीची पानं, 1 कप पाणी, पाव चमचा चहा पावडर, चवीसाठी मध किंवा साखर घालावी.  तुळशीच्या पानांचा चहा तयार करताना सर्वात आधी भांड्यात पाणी उकळण्यास ठेवावं. पाणी उकळलं की त्यात चहा पावडर घालून पाणी पुन्हा उकळू द्यावं. नंतर यात तुळशीची पानं घालावी. तुळशीची पानं घालून चहा उकळल्यानंतर गॅस बंद करावा. चहा गाळून घ्यावा.  शेवटी त्यात  मध किंवा साखर घालावी. 

Image: Google

लिंबू घालून तुळशीचा चहा

या पध्दतीनं चहा करण्यासाठी एक कप पाणी, 7-8 तुळशीची पानं,  अर्धा लिंबू, पाव चमचा चहा पावडर, चवीसाठी मध किंवा साखर घ्यावी. सर्वात आधी भांड्यात पाणी उकळून घ्यावं. नंतर त्यात चहा पावडर घालावी. चहा पावडर घालून पाणी पुन्हा उकळलं की त्यात तुळशीची पानं घालावी. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. नंतर त्यात लिंबू पिळावा. चहा गाळून घ्यावा. यात साखर किंवा मध घालून चहा प्यावा.

आलं घालून तुळशीचा चहा

आलं घालून तुळशीचा चहा करण्यासाठी अर्धा इंच आलं, 1 चमचा चहाची पावडर, अर्धा कप दूध, 1 कप पाणी आणि चवीनुसार साखर घ्यावी.  चहा करताना भांड्यात दूध, पाणी, साखर आणि चहाची पावडर  घालावी. हे मिश्रण उकळण्यास ठेवावं. त्यात आलं बारीक तुकडे करुन किंवा किसून घालावं. आलं घातल्यानंतर चहा दोन तीन मिनिटं उकळावा. नंतर यात तुळशीची पानं घालून पुन्हा चहा दोन मिनिटं उकळावा. चहा चांगला उकळला की गॅस बंद करुन गाळून घ्यावा. 
तुळशीचा चहा दिवसभरात केव्हाही प्यायला तरी चालतो. पण चांगल्या परिणामांसाठी तो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी प्यावा.


 

Web Title: 10 benefits of drinking Basil Tea.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.