पोटावर वाढलेली चरबी ही अनेक महिलांची समस्या असते. अगदी तरुणींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांनाच या समस्येचा सामना करावा लागतो. पोटावर चरबी लटकत असल्याने अनेकदा फॅशनेबल कपडे घालण्यावरही बंधने येतात. पोटाचा घेर वाढण्यामागे बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती किंवा आरोग्याच्या इतर काही समस्या अशी महत्त्वाची कारणं असतात. एकदा पोटाचा घेर वाढला की तो कमी करणे अतिशय अवघड होते. पण वेळीच योग्य ती काळजी घेतली तर वाढलेली ही चरबी काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. व्यायाम ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून रोजच्या रोज २ सोपे व्यायामप्रकार केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. पाहूयात हे व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे (2 Easy and effective Exercises for belly fat).
१. दोन्ही हात भिंतीला लावायचे आणि भिंतीसमोर उभे राहायचे. एक एक पाय काटकोनात वर उचलायचा. हा व्यायाम वेगाने केल्यास पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होण्यास मदत होते. दिसायला हा व्यायामप्रकार सोपा दिसत असला तरी तो करताना मात्र काही वेळातच दम लागतो. मात्र यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते. किमान ५० वेळा हा व्यायाम केल्यास चांगला व्यायाम होतो.
२. दुसरा व्यायामही याच प्रकारातील असून पाय गुडघ्यात वाकवल्यानंतर तो सरळ वर न आणता तिरका दुसऱ्या पायाच्या बाजूला वर न्यायचा. त्यामुळेही पोटाच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो आणि वाढलेले पोट कमी होण्यास याचा चांगला फायदा होतो. हे दोन्ही व्यायामप्रकार साधारणपणे महिनाभर नियमित केल्यास पोटाचा घेर कमी होण्यास याचा चांगला फायदा होतो.