आपलं वजन वाढतं म्हणजे शरीराच्या ठराविक भागांवर चरबी जमा व्हायला लागते. काहींची कंबर वाढते तर काहींचा माड्यांचा भाग वाढतो. मात्र वजन वाढणे म्हटल्यावर बहुतांश जणांचा पोटाचा भाग वाढायला लागतो. पोट एकदा वाढलं की ते कमी करणं म्हणजे मोठा टास्क असतो. बरेच दिवस ठराविक व्यायाम, नेमके डाएट केल्यावर पोटावर वाढलेली चरबी कमी होते (Weight Loss Tips). महिलांमध्ये तर वाढलेले पोट म्हणजे सौंदर्यात बाधा आणणारी एक महत्त्वाची गोष्ट असते. पोट वाढले की ना फॅशनेबल कपडे घालता येतात ना आणखी काही. पोट वाढल्याने शरीर बेढब दिसते आणि विनाकारण आपण आहोत त्यापेक्षा वयाने मोठे दिसायला लागतो (3 Best Drinks to lose Belly Fat).
न्यूट्रीएंटसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, खूप गोड, तेलकट, मसालेदार पदार्थ यांमुळे आपली त्वचा खराब होते, त्याचप्रमाणे आपल्या शरीरावरील चरबी वाढण्यासाठीही हे पदार्थ घातक असतात. ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी आहारात नियमितपणे काही पेयांचा समावेश केल्यास त्याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. इट धीस, नॉट दॅट यांनी केलेल्या एका वृत्तानुसार कोणत्या पेयांमुळे पोटावरचे फॅटस बर्न होण्यास फायदा होतो पाहूयात.
१. ब्लॅक कॉफी
आपण ऑफीसमध्ये किंवा घरातही ब्रेक म्हणून कॉफी घेतो. कॉफी ही दुधाची असल्याने चहापेक्षा काही प्रमाणात हेल्दी असे आपल्याला वाटत असले तरी सतत जास्त प्रमाणात कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आहारतज्ज्ञ डाना एलिस हन्स म्हणतात, ब्लॅक कॉफी ही कॅलरी फ्री असते. तसेच या कॉफीमध्ये अँटी इन्फ्लमेटरी अँटीऑक्सिडंटस असतात. त्यामुळे फॅट बर्न करण्यासाठी ही कॉफी अतिशय उपयुक्त असते. फॅट बर्न करण्याबरोबरच त्वचा नितळ आणि ताजीतवानी ठेवण्यासाठीही या कॉफीचा अतिशय चांगला उपयोग होतो. तसेच अशाप्रकारची कॉफी पिण्याचे कोणतेही साइड इफेक्टस नसल्याने तुम्हाला पोट कमी करायचे असेल तर तुम्ही नियमितपणे ही कॉफी घेऊ शकता.
२. ग्रीन टी
भारतात चहा हे प्रामुख्याने प्यायले जाणारे पेय आहे. मात्र चहामुळे अॅसिडीटी होण्याची शक्यता असते. तसेच सतत चहा घेतल्याने भूक मोड होते. चहा गरम असल्याने थंड वातावरणात घशाला चांगला वाटत असला तरी त्यातून बरीच साखर पोटात जात असल्याने जास्त प्रमाणात चहा पिणे योग्य नाही. त्याऐवजी आपण ग्रीन टी घेऊ शकतो. ग्रीन टी मध्येही चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटस असल्याने ते लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त ठरतात. तुम्हाला दिर्घकाळ तरुण दिसायचे असेल आणि चेहऱ्यावर सुरकुत्या नको असतील तर ग्रीन टी पिणे फायद्याचे ठरते.
३. ब्लॅक टी
हल्ली बरेच जण फॅड म्हणून किंवा डाएट म्हणून ब्लॅक टी पितात. पण सामान्य चहापेक्षा ब्लॅक टी घेणे आरोग्याच्यादृष्टीने जास्त फायद्याचे असते. मेटबॉलिझम बूस्ट करण्यासाठी ब्लॅक टी चा चांगला उपयोग होतो. त्वचा ताजीतवानी राहण्यासाठी आणि शरीरातील पाण्याची पातळी चांगली ठेवण्यासाठी ब्लॅक टी फायदेशीर असतो. त्यामुळे चहा पिण्याची इच्छा झाली की नेहमीचा चहा घेण्यापेक्षा ब्लॅक टी घेणे केव्हाही जास्त फायदेशीर असते.