वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत केवळ एकच एक गोष्टीचा उपयोग होत नाही. व्यायाम आहार यासोबतच डीटॉक्स ड्रिंक्सची जोड दिली तर वजन कमी होण्याला मोठा हातभार लागतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न जर गांभीर्यानं करत असाल तर आपल्या रोजच्या आहारात डीटॉक्स ड्रिंक्स हवंच. डीटॉक्स ड्रिंक्स हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतं. चयापचयाची क्रियाही डीटॉक्स ड्रिंक्समुळे सुधारते. चयापचय चांगलं झालं तर पचन क्रिया चांगली राहाते आणि त्याचा फायदा वजन कमी होण्यास होतो. आलं लिंबू, दालचिनी आणि काकडी पुदिना या तीन प्रकारचे डीटॉक्स ड्रिंक्स आपण सहज तयार करु शकतो . या डीटॉक्स ड्रिंक्सचे फायदेही खूप आहेत.
1. लिंबू आणि आलं
छायाचित्र- गुगल
वजन कमी करण्यात डीटॉक्स ड्रिंक्सची भूमिका खूप महत्त्वाची आहे. लिंबू आणि आल्यापासून तयार केलं जाणारं हे डीटॉक्स ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला हवं. लिंबू आल्याचं डीटॉक्स ड्रिंक शरीराला ताकद देतं तसंच यामुळे चयापचयाची क्रियाही सुधारते.हे डीटॉक्स ड्रिंक पिण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धं लिंबू पिळावं आणि या पाण्यात एक इंच आलं आधी धुवून मग किसून घ्यावं आणि ते या पाण्यात घालावं. हे पाणी चमच्यानं चांगलं ढवळून घ्यावं. हे पाणी रोज सकाळी दोन ग्लास याप्रमाणे दोन महिने पिल्यास त्याचा परिणाम दिसतो.
2. दालचिनीचं डीटॉक्स ड्रिंक
छायाचित्र- गुगल
दालचिनी डीटॉक्स ड्रिंकमुळे आपली चयापचयाची क्रिया सुधारते. शिवाय दालचिनीमुळे चरबी विरघळतेही.दालचिनी डीटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी एका जारमधे कोमट पाणी घ्यावं. त्यात एक छोटा चमचा दालचिनी पावडर घालावी. हे डीटॉक्स ड्रिंक रात्री झोपताना प्यावं. काही दिवस हे पाणी नियमित पिल्यास आपल्याला अपेक्षित परिणाम दिसून येतात.
3. काकडी आणि पुदिना
छायाचित्र- गुगल
काकडी आणि पुदिना या डीटॉक्स ड्रिंकमुळे शरीरातील घातक विषारी घटक बाहेर पडतात. शिवाय या डीटॉक्स ड्रिंकची चव आणि गंधही मोहक असतो. काकडी आणि पुदिना पाण्यात घातल्यानंतर त्यातील पोषक तत्त्वं पाण्यात विरघळतात. हे डीटॉक्स ड्रिंक पिल्यामुळे पचन सुधारतं.काकडी आणि पुदिना डीटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी एका ग्लासमधे थोडे काकडीचे तुकडे आणि थोडी पुदिन्याची पानं घालावी. ते पाणी थोडा वेळ तसंच ठेवावं. हे पाणी दिवसभर थोडं थोडं पिलं तर चालतं.