वजन कमी करणं हा सध्या अनेकांपुढील एक महत्त्वाचा टास्क असतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर वजन कमी करणार म्हणून संकल्प करणाऱ्या अनेकांनी जिम, योगा क्लास, झुंबा क्लास असे काही ना काही लावलेले असते. मात्र हा संकल्प फारतर महिनाभर किंवा दोन महिने टिकतो. पण रोजच्या धावपळीतून तासभर वेळ काढणं सगळ्यांना जमतंच असं नाही. मात्र वाढलेलं वजन तर कमी करायचं असतं. सतत बैठं काम, हालचाल कमी, जंकफूडचे सेवन, ताण यामुळे वजन वाढत जाते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी १० ते १५ मिनीटांत काही सोपे व्यायामप्रकार केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. कमीत कमी वेळात होणारे आणि वजन कमी करण्यास फायदेशीर असलेले हे व्यायामप्रकार कोणते पाहूया (3 Exercises To Loose Full Body Fat)...
१. फ्रंट जॅक
दोन्ही पाय बाजूला करुन हात वर करुन उड्या माराव्या. यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि शरीरावरची चरबी घटण्यास चांगली मदत होते. सुरुवातीला काऊंट कमी करत हळूहळू वाढवत न्यावा. एका सेटमध्ये २० वेळा असे ५ सेट करावेत. घरच्या घरी ५ मिनीटांत होणारा हा व्यायाम आपण अगदी सहज करु शकतो.
२. बट किक्स
बहुतांशवेळा बैठ्या कामामुळे आपल्या कंबरेची, मांड्यांची आणि पोटावरची चरबी वाढते. अशावेळी मांडीचा आणि कंबरेचा व्यायाम होण्यासाठी या किक्स अतिशय फायदेशीर ठरतात. पाय गुडघ्यात वाकवून टाचा नितंबांना टेकवण्याचा प्रयत्न करायचा. एका सेटमध्ये २० असे ५ सेट्स दररोज केल्यास याचा चांगला फायदा होतो.
३. साईड स्विंग
आपलं शरीर झोपाळ्याप्रमाणे उचलणं वाटतं तितकं सोपं नसतं. हात कंबरेवर ठेवून एक पाय हवेत आणि एक जमिनीवर असे साईड स्विंग करायचे. यामुळेही संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि चरबी घटण्यास मदत होते. हे तिन्ही प्रकार करायला फक्त १० ते १५ मिनीटे लागतात. पण त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जी टिकून राहण्यास मदत होते.