वजन कमी करणे हे सध्या अनेकांपुढील एक महत्त्वाचे आव्हान झालेले आहे. गेल्या काही वर्षात वाढत्या वजनाने हैराण असलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि आरोग्याच्या समस्यां यांमुळे वजन वाढते आणि मग ते कमी करताना अक्षरश: कस लागतो. वाढलेले वजन कमी होणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नक्कीच नाही. वजन वाढले की रक्तदाब, पीसीओडी, मधुमेह, कोलेस्टेरॉल यांसारख्या समस्या डोकं वर काढतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहार, व्यायाम यांकडे लक्ष द्यावे लागते. पण केवळ यांकडेच लक्ष देऊन उपयोग नाही तर आणखीही काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज असते. या गोष्टी कोणत्या आणि त्यांच्याकडे लक्ष दिल्यास वजन कमी होण्यास कशी मदत होते हे समजून घेऊया (3 Important habits that are harmful for weight loss)...
१. झोपेकडे दुर्लक्ष
वजन कमी करायचं असेल की आपण व्यायाम आणि आहार यांच्याकडे नीट लक्ष देतो. पण झोपेकडे मात्र पुरेसे लक्ष देत नाही. कधी कामाच्या व्यापात तर कधी इतर गोष्टींमुळे आपले झोपेकडे दुर्लक्ष होते. परंतु झोप ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची गोष्ट असून त्याचा वजनावर परीणाम होत असतो. झोप ही आपल्या हार्मोन्सशी निगडीत असल्याने वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पुरेशी झोप मिळाली नाही तर वजन कमी न होता ते वाढते किंवा आहे तेवढेच राहते.
२. एकप्रकारचे डाएट
वजन कमी करण्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. वजन कमी करायचे असेल तर बरेचदा लोक एकाच प्रकारचा आहार बरेच दिवस घेताना दिसतात. याचा सुरुवातीला चांगला रिझल्ट दिसतो पण कालांतराने अशाप्रकारच्या डाएटचा वजन कमी करण्यावर परीणाम होईनासा होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे एकाच प्रकारचा आहार घेतल्यावर शरीराला एकाच प्रकारचे पोषक तत्त्व मिळतात आणि काही पोषक तत्त्व मिळत नाहीत.
३. पाणी पिण्याचे महत्त्व
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत आपण आहारात प्रोटीन जास्त प्रमाणात घेत असतो. पण त्या प्रमाणात आपण पाण्याचे प्रमाण वाढवत नाही. असे केल्याने वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त असते. प्रोटीन पचण्यासाठी शरीरात पुरेसे पाणी असायला हवे. तसेच पाण्याने पोट भरलेले असेल तर ओव्हरइटींग होत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.