Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > ३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

कॅलरी मोजूनमापून खाणं अनेकांना जमत नाही, वेळ नसतो, काम वाढलं असं वाटतं, त्यांना वजन कमी करण्यासाठी मदत करणारं एक पोषक सूत्र.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 02:26 PM2021-05-25T14:26:59+5:302021-05-25T14:47:24+5:30

कॅलरी मोजूनमापून खाणं अनेकांना जमत नाही, वेळ नसतो, काम वाढलं असं वाटतं, त्यांना वजन कमी करण्यासाठी मदत करणारं एक पोषक सूत्र.

3 Plate - 2 Snacks - Portion Control diet, Formula To Lose Weight | ३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

३ प्लेट-२ स्नॅक्स - डाएट आणि पोषण सांभाळत वजन कमी करण्याचा ‘पोर्शन कण्ट्रोल’ फॉर्म्युला

स्वप्नाली बनसोडे


काय मग थोडं गणित करून, कॅलरीज मोजून खायला सुरूवात केली का? थोडं अवघड जात  सुरूवातीला! सवय नाही त्यामुळे  हे एक एक्स्ट्रा काम असंही वाटतंच. या सगळ्यात किती वेळ जातोय, वजन पटापट कमी व्हायला हवं असं वाटत  असंही मनात येतंच. पण एक लक्षात ठेवा, घाई करून काहीच उपयोग होत नाही. मला माहितीये. वजन खूप पटकन कमी व्हावं, ही सगळ्यांचीच इच्छा असते. पण एक लक्षात घ्या तुमचं वजन काय गेल्या काही आठवड्यात किंवा ३०-४० दिवसांत अचानक वाढलंय का? नाही ना? मग ते लगेच दोन चार आठवड्यात कमी व्हावं अशी अपेक्षा तरी का? करायची? जर तुम्ही वाट्टेल ते करून लवकरात लवकर वजन कमी करायचा प्रयत्न करत असाल तर, एक ते आरोग्यासाठी धोकादायक तर आहेच आणि वाईट गोष्ट ही की, तुम्ही अघोरी उपाय करून खूप वजन पटापट कमी केलंत तर ते तितक्याच लवकर ते परत येणार आहे, कदाचित गेल्या वेळेपेक्षाही जास्त वाढेल वजन!! बघा काय परवडतंय ते!
काय म्हणताय? तरीही कॅलरीज मोजून मापून खाणं, हे अवघडच वाटतंय? मी समजू शकते, की कॅलरी मोजणे आणि सायंटिफिक प्रकारे वजन कमी करणं, हे फार महत्वाचं असलं तरी काही लोकांना ते अवघड वाटू शकतं. कारण एक तर कॅलरीज मोजणं हा एक Extra Task वाटतो किंवा कॅलरी मोजता मोजता काही जणांना anxiety होऊ शकते, तर अश्या सगळ्यांसाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत मी आज सांगणार आहे. तर या पद्धती मध्ये तुम्ही दिवसभरात ३ प्लेट आणि २ स्नॅक खाऊ शकता. 


तर करायचं इतकंच आहे, हे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.


आता अट अशी आहे या ३ प्लेट मध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर मध्ये प्लेटचा अर्धा हिस्सा हिरव्या दिसणाऱ्या भाज्या असल्या पाहिजेत, दुसरा हिस्सा साधारण तळहाताएवढं असं प्रोटीन मग ते पनीर, टोफू, चीज, सोया, चिकन, फिश, अंडी, इ. काही असू शकतात. आणि राहिलेला तिसरा पाव भाग तुम्हाला आवडेल ते कार्ब्ज, म्हणजे भात, पोळी , ब्रेड इ. काहीही ठेवू शकता. आणि बाकी दोन स्नॅकपैकी एका स्नॅकमध्येे १-२ ताजी सीझनल फळं, २-५ काजू- बदाम तुकडे असं ठेवा आणि एक स्नॅक तुम्हांला आवडतोय तो चहा, कॉफी, ज्यूस, कमीत कमी साखरेसह ठेवा.
 तुम्हाला ती १-२-३ मेथड आठवत असेलच ना? प्रसिद्ध आहा्रतज्ज्ञ जॉर्डन स्यातची पद्धत. त्यानेच सांगितलेला वरचा हा पोर्शन कंट्रोलचा उपाय. ज्या लोकांना सारख्या कॅलरीज मोजणं मोठा टास्क वाटतो, किंवा फारच बिझी शेड्यूलमुळे तेवढा वेळ नसतो,अथवा ज्यांना वजन थोडं सावकाश कमी झालेलं चालणार आहे, किंवा तुम्ही बाहेर कुठंतरी आहात आणि स्वत:चा स्वयंपाक स्वत: सगळं मोजून मापून करू शकत नाहीएत, तर ही पद्धत वापरा.अर्थात या सोबत तुम्हांला दररोज किमान अर्धा तास स्ट्रेंथ ट्रेनिंग अर्थात डंबेल्स उचलून स्नायूंचे व्यायाम करायचे आहेत, शिवाय शक्य तितकं ॲक्टिव्ह राहायचंय, हालचाल करायची आहे, तरच वजन कमी व्हायला मदत होणार आहे.


तुम्हांला जर सारख्या सारख्या कॅलरीज मोजून टेन्शन येत असेल, त्यात फार वेळ जातोय असं वाटत असेल तर किमान ही पद्धत तरी अंमलात आणाच. याने वजन कमी व्हायला थोडा वेळ लागेल, पण हळूहळू वजन उतरेल. अर्थात फिटनेस कोच म्हणून मला विचाराल तर, प्रत्येक वेळी शिजवण्याआधी अन्न छोट्या वजनकाट्यावर मोजून मापून, कॅलरीजचा हिशोब करून खाणंच योग्य आहे, असं मी सांगेन. जर तुम्हांला शास्त्रीय पद्धतीने आणि एका विशिष्ट गतीने वजन कमी करायचं असेल, तर या मेहनतीला पर्याय नाही.
 बॉस, कुछ पाने के लिए कुछ करना तो पडेगा ना! पण हे नसेलच जमत तर वर सांगितलेली पोर्शन कंट्रोलची पद्धत तरी वापराच, नक्की फायदा होईल.

(लेखिका अमेरिकािस्थित डाएट आणि फिटनेस एक्सपर्ट आहेत.)

Instagram- the_curly_fit
https://www.facebook.com/fittrwithswapnali

Web Title: 3 Plate - 2 Snacks - Portion Control diet, Formula To Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.