वजन घटवण्यासाठी घरी तयार केलेले नॅचरल डिटॉक्स ड्रिंक्स हे जास्त उपयुक्त असतात. शिवाय हे नॅचरल डिटॉक्स ड्रिंक्स निरोगी त्वचा, सुरळीत पचनसंस्था आणि ह्दय यांच्यासाठीही उत्तम असतात. लिंबू- आलं, जिरे-दालचिनी आणि चिया- लिंबू या तीन प्रकारचे पेय नॅचरल डिटॉक्स ड्रिंक्स म्हणून उत्तम असून ते तयार करायलाही सोपे आहेत.
लिंबू- आलं
लिंबू आलं डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासठी लिंबू, आलं, दालचिनी, मिरे हे जिन्नस लागतं. लिंबू हे क जीवनसत्त्वाचा मुख्य स्त्रोत आहे. आहारातील लोह शोषण्यास हे जीवनसत्त्व मदत करतं सोबतच त्वचा नितळ करतं आणि हदयरोगाचा धोका कमी होतो. लिंबाच्या सेवनामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून आजारांचा धोका कमी होतो. लिंबामधील सायट्रिक अँसिडमुळे किडनी स्टोन तयार होत नाहीत. लिंबातल्या तंतूमय घटकांमुळे पचन सुधारतं आणि बध्दकोष्ठता होत नाही.
आल्यामुळे पचन सुधारतं. भूक नियंत्रित राहाते. लिंबू आलं एकत्र घेतल्यास त्याचा वजन कमी होण्यास लाभ होतो. दालचिनीत दाह आणि सूज कमी करणारे आणि जीवाणूविरोधी घटक असतात. मिर्यांमुळे चयापचय क्रिया सुधारते आणि शरीरातील जास्तीच्या कॅलरीज जळून जातात.
लिंबू आल्याचं डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी लिंबाचा रस , एक हिरवा आणि पिवळा लिंबू , एक इंच आलं, दोन इंच दालचिनी , अर्धा चमचा मिरे घ्यावेत.
हिरव्या आणि पिवळ्या लिंबाचे तुकडे करुन घ्यावेत. पिवळ्या लिंबाचे बारीक तुकडे करावेत आणि हिरव्या लिंबाचे जाडसर तुकडे करावेत. आलं धुवून किसून घ्यावं. एक लिटर पाणी घ्यावं. त्यात हिरव्या पिवळ्या लिंबाच्या फोडी, आल्याचा किस, दालचिनीचे तुकडे आणि मिरे घालावेत. हे पाणी चांगलं उकळून घ्यावं. लिंबाची सालं मऊ होईपर्यंत आणि सर्वांचा स्वाद पाण्यात उतरेपर्यंत पाणी उकळावं. गॅस बंद करुन हे पाणी गरम असतानाच गाळून घ्यावं. यात एक चमचा लिंबाचा रस आणि थोडं मध घालून कोमट असताना प्यावं.
छायाचित्र:- गुगल
जिरे- दालचिनी
जिरे आणि दालचिनी डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी जिरे आणि दालचिनी हे प्रमुख घटक लागतात. जिर्यामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि कोलेस्ट्रॉल कमी होतं.
हे डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी एक लिटर पाणी घ्यावं. त्यात तीन चमचे जिरे आणि तीन इंच दालचिनीचे तुकडे घालावेत. पाणी जिरे आणि दालचिनीचा स्वाद पाण्यात चांगला उतरेपर्यंत उकळावं. नंतर हे पाणी गरम असतांनाच गाळून घ्यावं. ते थोडं कोमट करावं. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून प्यावं.
चिया सीडस-लिंबू
चिया सीडस भूक नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास प्रोत्साहन देते. चिया सीडसमधे शून्य कोलेस्ट्रॉल असतं. चिया सीडस दहा मिनिटं पाण्यात भिजवाव्यात. दहा मिनिटात जेली सारखं मिश्रण तयार होतं. एका ग्लासमधे अर्धा ग्लास चिया सीडसचं मिश्रण आणि अर्धा ग्लास गरम पाणी घालावं. त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून ते प्यावं.