वजन कमी करण्यासाठी खायचं काय आणि कसं? यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. वजन कमी करायचं म्हणून नाश्ता डावलला किंवा विचार न करता काहीही खाल्लं तर त्याचा वजन कमी करण्याच्या उद्देशावर विपरित परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सकाळच्या नाश्त्याचा विचार बारकाईनं करायला हवा. आठवड्यातले दोन तीन दिवस सकाळी नाश्त्याला ऑइल फ्री पदार्थ करुन खाल्ले तर ते वजन कमी करण्यासोबतच आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतील.
नाश्त्याला ऑइल फ्री पदार्थ करणं म्हणजे सपक किंवा बेचव खाणं नाही. अनेक रुचकर पदार्थ बिना तेलाचे बनू शकतात. यात पनीर कॉर्न सलाड, गोड दलिया आणि बटाट्याची पोळी ( पराठा नाही) या पौष्टिक , रुचकर आणि पोटभरीच्या पदार्थांचा समावेश आहे.
Image: Google
पनीर कॉर्न सलाड
पनीरचे पदार्थ पचायला जड समजले जातात. पण पनीर कॉर्न सलाड हा तेलाशिवाय होणारा पदार्थ याला अपवाद आहे. पनीर कॉर्न सलाड करण्यासाठी अर्धा कप पनीरचे तुकडे, 1 कप उकडलेले गोड मका, 1 कप उकडून कापलेले बटाटे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप कापलेला टमाटा, 1 चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, 2 चमचे चाट मसाला, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिरे पूड एवढं साहित्य घ्यावं.
हे सलाड करण्यासाठी नॉन स्टिक पॅनमधे पनीरचे तुकडे घालून हलक्या हातानं परतून घ्यावे . पनीर थोडे लालसर झाले की ते काढून ठेवावेत. नंतर उकडलेले बटाटे, कांदा, टमाटा, मका आणि पनीरचे तुकडे एका खोलगट भांड्यात एकत्र करावेत. ते चांगले मिसळून घेतले की त्यात चाट मसाला लिंबाचा रस घालून ते चांगलं मिसळून घ्यावं. नंतर मीठ आणि मिरे पूड घालून सलाड पुन्हा एकत्र करुन घ्यावं. सर्वात शेवटी कोथिंबीर पेरावी.
Image: Google
गोड दलिया
दलिया हा आरोग्यासाठी उत्तम असतो. बिना तेलाचा दलिया करताना ज्यांना गोड आवडत असेल त्यांनी साखर घालून तो करावा, ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी त्यात थोडं मीठ घालावं. यासाठी दुधाऐवजी पाणी वापरावं.गोड दलिया करण्यासाठी 1 वाटी दलिया, 2 चमचे साजूक तूप, 2 ग्लास दूध, 5 चमचे साखर, थोडा सुकामेवा हे साहित्य घ्यावं.
दलिया करतानाआधी दलिया धुवुन घ्यावा. आणि मग कोरडा करुन घ्यावा. तो सुकला की एका कढईत थोडं तूप घ्यावं. ते गरम झालं की त्यात दलिया घालून तो लालसर परतून घ्यावा. तूपही नको असेल तर दलिया तसाच भाजला तरी चालतो. दलिया सोनेरी रंगावर परतला गेला की त्यात गरम केलेलं दूध घालावं. दुधामधे दलिया चांगला शिजू द्यावा. दलिया शिजल्यानंतर त्यात साखर आणि सुकामेवा घालावा. दलियाने दूध पूर्ण शोषून घेतलं की गॅस बंद करावा. हा दलिया थंड किंवा गरम या दोन्ही पध्दतीने खाल्ला तरी छान लागतो.
Image: Google
बटाट्याची पोळी
बटाट्याचा पराठा म्हटलं की तो शेकण्यासाठी तेल हवंच. पण बटाट्याची पोळी ही विनातेलाची करता येते आणि खमंगही लागते. बटाट्याची पोळी करताना 2 कप गव्हाची कणिक, 4-5 उकडलेले बटाटे , पाव चमचा जिरे, कोथिंबीर, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी आणि अर्धा चमचा मेथ्या एवढं जिन्नस घ्यावं.
बटाट्याची पोळी करताना बटाटे उकडून ते किसून घ्यावेत. त्यात जिरे, लाल तिखट, मीठ , कोथिंबीर घालून सारण एकजीव करावं. पोळीसाठी कणिक मळताना त्यात थोडं लाल तिखट आणि मीठ घालावं. कणिक भिजवून थोडा वेळ सेट होवू द्यावी. नंतर कणकेचे बारीक गोळे करुन ते लाटून त्यात बटाटयाचं सारण भरुन पोळी लाटावी.ही पोळी विना तेलानं तव्यावर दोन्ही बाजूंनी लालसर शेकावी.