मे महिना म्हणजे आब्यांवर ताव मारण्याचा महिना. आता हा महिना अर्धा संपत आला त्यामुळे शेवटच्या टप्प्यातल्या आंब्याच्या पेट्या घरोघरी असतील. एकदा पाऊस पडला की फारसा आंबा खाल्ला जात नाही. त्यामुळे या सिझनचा आंबा खाऊन घ्यायचा म्हणून अनेकांकडे दररोज आमरस केला जातो. आमरस असला की भाजी आमटी नसली तरी चालते. गरमागरम पोळ्या, पुऱ्या नाहीतर धिरड्यांसोबत आमरसावर ताव मारला जातो. हापूस किंवा पायरी आंब्याचा आमरस असेल तर त्याचा गोडवा इतका छान असतो की त्यात साखरही घालावी लागत नाही. हा आमरस थोडा गार करुन त्यावर तूप आणि मिरपूड घालून खाण्याची मजाच काही और आहे (3 Tips While Having Mango Or Mango Pulp aamras).
आमरस असल्याने नकळत आपण १ किंवा २ पोळ्या जास्त खातो. आमरस हा अनेकांचा विक पॉईंट असल्याने त्यावर ताव मारला जातो. अनेक ठिकाणी तर सकाळ-संध्याकाळच्या जेवणार आमरस असतोच असतो. वर्षातून एकदाच मिळणारा हा फळांचा राजा आपल्याला कितीही प्रिय असला तरी जास्त प्रमाणात खाल्ल्यास कॅलरीज वाढण्याची शक्यता असते. आंबा ब्लेंड केला म्हणजे त्याचा रस काढला की त्यातील कॅलरीज शरीरात जास्त प्रमाणात आणि वेगाने शोषल्या जातात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. तसेच आंब्याच्या रसामुळे इन्शुलिन लेव्हलही वाढते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तुम्ही आंब्याचा रस खाऊ शकता असे आहारतज्ज्ञ सांगतात. मात्र त्याहून जास्त आमरस खाणे होत असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात.
१. आहाराचे नियोजन
आमरस दुपारच्या जेवणात खाल्ला तर संध्याकाळच्या जेवणात एकदम हलका आणि कमीत कमी कॅलरीज असलेला आहार घ्यायला हवा. दोन्ही वेळेस आमरस खाल्ला तर पचनासाठी आणि एकूण रक्तातील साखर, इन्शुलिन वाढण्यासाठी तो कारणीभूत ठरतो आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम व्हायची शक्यता असते. त्यामुळे दुपारी आमरस खाल्ला तर रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा.
२. बॅलन्स डाएट
आमरस खाल्ला तरी नुसती आमरस पोळी न खाता त्यासोबत भाजी, कोशिंबीर अशा प्रोटीनयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश करायला हवा. त्यामुळे शरीराला आवश्यक ते सगळे घटक मिळण्यास मदत होते. नाहीतर आमरस आवडतो म्हणून अनेकदा फक्त आमरसच दणकून खाल्ला जातो. तसेच आमरसाचा बेत असल्यावर आपण पोळी, पुऱ्या जास्त खातो. मात्र तसे न करता ताटातील इतर पदार्थ जास्त खावेत आणि पोळी किंवा पुरी आपण नियमित खातो किंवा जितकी भूक आहे तितकीच खावी.
३. शारीरिक हालचाल
आमरसाचे जेवण केल्यावर भर उन्हात हमखास ग्लानी येते. मात्र तरीही जेवण झाल्यावर आवर्जून शतपावली करायला हवी. इतकेच नाही तर शक्य असल्यास संध्याकाळच्या वेळी मुद्दाम चालत बाहेरची कामे करणे, घराचे जिने चढणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे किमान व्यायाम करायला हवेत. त्यामुळे आंबा पचण्यास मदत होते. कॅलरीज बर्न झाल्या की त्याचे अनावश्यक चरबीमध्ये रुपांतर होत नाही. त्यामुळे आमरसाच्या जेवणानंतर शारीरिक हालचाल अत्यावश्यक आहे.