वाढलेलं वजनाचं रोज टेन्शन येतं. कमी केलेलं वजन पटकन वाढतं. एवढ्या टिप्स आणि एवढे सल्ले.. ढीगभर फाॅरवर्डस आणि इनबाॅक्स फुल करुन वाहून जातील एवढे व्हिडिओज आहेत, पण वजन नेमकं कसं कमी करायचं, काय केलं म्हणजे कमी केलेलं वजन वाढणार नाही याचं नेमकं उत्तर कोणीच सांगत नाही. कुठलेही पर्याय केले तरी वाढलेल्या / वाढणाऱ्या वजनावर नेमका उपाय कोणता करावा कळत नाही. कधी कधी उपाय इतके अवघड असतात की दुकानं पालथी घाला, ती सांगितलेली विशिष्ट गोष्ट कधीच मिळत नाही. आणि काही उपाय इतके सोपे असतात की त्याकडे कधी हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी उपाय ठरतील असा विचारही मनात न येता त्याकडे दुर्लक्ष होतं. खरंतर वजन कमी करण्याचे नैसर्गिक उपाय अगदी आपल्या हाताशी आहेत. स्वयंपाकघरात डोकावलं तरी सापडतील असे.
Image: Google
पाणी, लिंबू, आलं दालचिनी, काकडी,पुदिना, मध हे तर आपल्याकडे असतंच. वजन कमी करण्याचा , नियंत्रित ठेवण्याचा नैसर्गिक म्हणजे पाणी. केवळ योग्य प्रमाणात पाणी पिऊनही आपण आपलं वजन कमी करु शकतो असं संशोधन सांगतं. दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. हे प्रमाण पाळलं जात नाही आणि मग पाण्यामुळे शरीराचं जे नैसर्गिक शुध्दीकरण होतं ते होत नाही. शरीरात विषारी घटक साचतात, त्याचा परिणाम आरोग्यावर, सौंदर्यावर आणि वजनावर दिसून येतो. तज्ज्ञ म्हणतात, की दिवसाला आवश्यक असलेल्या पाण्याच्या एकूण प्रमाणापैकी थोडंसं पाणी जर नैसर्गिक घटकांचा वापर करुन पिलं तर ते उत्तम आणि नैसर्गिक डिटाॅक्स ड्रिंक्स ठरतील. या डिटाॅक्स ड्रिंक्सचा परिणाम म्हणून केवळ वजनच कमी होईल असं नाही तर एकूणच आरोग्य सुधारण्यास आणि त्वचा निरोगी होण्यास मदत होईल. असे 3 प्रकारचे डिटाॅक्स ड्रिंक्स आपल्याला स्वयंपाकघरात उपलब्ध गोष्टीतून करता येतात. लिंबू, दालचिनी, काकडी, पुदिना, मध आणि पाणी या गोष्टींचा वापर करुन तयार होणारे डिटाॅक्स ड्रिंक्स वजनावर योग्य काम करतात असं तज्ज्ञ म्हणतात. 7 गोष्टींचा उपयोग करुन 3 डिटाॅक्स ड्रिंक्स कसे तयार करायचे याचं मार्गदर्शनही तज्ज्ञांनी केलं आहे.
Image: Google
1. दालचिनी आणि मध
दालचिनी आणि मध या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी उपकारक आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून दालचिनी म्हणजे विषाणू, जिवाणू विरोधी आणि बुरशीविरोधी आहे. तर मधात ॲण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण विपुल असतं. छोटा पाव चमचा दालचिनी पावडर आणि मध कोमट पाण्यात घेतल्यास त्याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. तज्ज्ञ सांगतात, मधाचा उपयोग करुन जे डिटाॅक्स ड्रिंक तयार करायचं असतं त्यासाठी कधीही एकदम गरम पाणी घेऊ नये. गरम पाण्यात मध मिसळून पिणं चुकीचं आहे. त्यासाठी कोमट पाणीच हवं. दालचिनी पावडर आणि मधाचं डिटाॅक्स ड्रिंक रोज सकाळी उठल्यावर घेतल्यास त्याचा वजनावर तर परिणाम दिसतोच शिवाय यामुळे हदयरोगाचा धोका कमी होतो. शरीरावर असलेली सूज कमी होते. तसेच दालचिनी पावडर न वापरता अख्खी दालचिनी वापरुनही हे डिटाॅक्स ड्रिंक तयार करता येतं. यासाठी दीड ग्लास पाणी घ्यावं. एक छोटा तुकडा दालचिनीचा घ्यावा. पाण्यात दालचिनी घालून ते उकळावं. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. पाणी ग्लासमधे टाकावं. ते कोमट होवू द्यावं. मग त्यात 1चमचा मध मिसळून हे पाणी प्यावं.
Image: Google
लिंबू- आलं - मध
लिंबू आणि आलं यांचा स्वयंपाक आणि औषध असा दुहेरी उपयोग होतो. लिंबू -आलं आणि मध यांचा वापर करुन असरदार डिटाॅक्स ड्रिंक तयार होतं. यासाठी एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात थोडं किसलेलं आलं घालावं. हे पाणी चांगलं उकळावं. ते उकळून निम्मं झालं की गॅस बंद करावा. पाणी थोडं कोमट करावं. मग त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालून ते चांगलं हलवून घ्यावं. आलं आणि लिंबू या दोन गोष्टींचा वापर करुन तयार होणारं डिटाॅक्स ड्रिंक प्यायलं तर त्यामुळे शरीरातील घाण आणि विषारी घटक बाहेर पडायला मदत होते. आल्यामुळे भूक नियंत्रणात राहाते. आणि लिंबाच्या रसातून शरीराला क जीवनसत्त्व आणि ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. त्यामुळे लिंबू आलं एकत्रिर्त केलेलं पेय पिल्यानं शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. चवीसाठी म्हणून यात एक चमचा मध घातलं तर त्याचा आरोग्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठीही होतो. हे डिटाॅक्स ड्रिंक सकाळी उठल्यावर नियमित घेतल्यास त्याचा हवा तो परिणाम दिसून येतो असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
काकडी आणि पुदिना
चव, पोषण आणि ताजेपणा हे गुण काकडी आणि पुदिन्यात असतात. यासाठी एक काचेची बाटली घ्यावी. त्यात शुध्द पाणी भरावं. या बाटलीत काकडीचे पातळ काप आणि थोडी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घालावेत. बाटलीला झाकण लावून बाटलीतलं पाणी चांगलं हलवून घ्यावं. पाण्यात काकडी आणि पुदिना घातल्यानंतर तीन चार तासांनी या बाटलीतलं थोडं थोडं पाणी दिवभर प्यावं. हे डिटाॅक्स ड्रिंक सकाळी उठल्यावर प्यायला हवं असा नियम नाही. काकडी आणि पुदिना घालून तयार केलेलं पाणी पिल्यास वजन कमी होतं आणि या दोन घटकातील गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रणात राहातो. हे पाणी पिल्यानंतर थकवा दूर होतो. ताजंतवानं वाटतं. कामाचा उत्साह वाढतो. तसेच हे डिटाॅक्स ड्रिंक नियमित घेतल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. तज्ज्ञ सांगतात वर दिलेले तिन्ही डिटाॅक्स ड्रिंक्स हे केवळ वजनच घटवत नाही तर आरोग्यास पोषक घटकांचा लाभ देतात आणि गंभीर आजारांच्या धोक्यापासून सुरक्षाही देतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी, ते नियंत्रित ठेवण्यासाठी हे 3 प्रकारचे डिटाॅक्स ड्रिंक्स पिण्याचा सल्ला देतात.