Join us  

3 प्रकारचे वेटलाॅस सूप, पोटही भरेल आणि वजनही कमी होईल! टेस्ट आणि तब्येत दोन्ही बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 6:56 PM

पोट भरेल आणि वजनही होईल कमी.. वेटलाॅस सूपचा दुहेरी फायदा! 3 प्रकारचे वेटलाॅस सूप टेस्टी आणि हेल्दीही!

ठळक मुद्देकोबीच्या सूपने चयापचय क्रियेची गती वाढून वजन कमी होण्यास मद्त होते. भाज्या घालून केलेलं पास्ता सूप म्हणजे वजन कमी करण्यासाठी भरगच्च अन चविष्ट सूप.सूपच्या स्वरुपातही ओटस वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. 

चव सांभाळायची, आरोग्य जपायचं आणि वजनही कमी करायचं हे सोपं काम नाही . चवीचा विचार केला तर वजन कमी होणं हे अशक्य असल्याचं वाटतं अनेकांना. अनेकांच्या बाबतीत होतंही असंच. पण सूप हा प्रकार असा आहे ज्याद्वारे चव, आरोग्य आणि वजन या तिन्ही गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या जातात.  चविष्ट लागणारे सूप ,पाहाताक्षणी खावेसे -प्यावेसे वाटणारे सूप वजनही कमी करतात याची खात्री सूपचे हे 3प्रकार नक्की देतात. करुन तर पाहा!

Image: Google

कोबीचं सूप

पत्ता कोबीचं सूप चविष्ट लागतं आणि वजनही कमी करतं. या सूपमध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे कोबीचं सूप पिऊन वजन कमी करता येतं. पोटाचं आरोग्य सांभाळण्यासोबतच कोबीच्या सूपमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून बाॅडी डिटाॅक्स होते. कोबीच्या सूपने चयापचय क्रियेची गती वाढते. कोबीच्या सूपमधून शरीरास फायबर, जीवनसत्वं आणि खनिजंही मिळतात.

Image: Googleकोबीचं सूप करण्यासाठी 2 मोठे कांदे, 2 हिरव्या मिरच्या, 1 मोठा टमाटा, 3-4 मश्रुम, 4-5 लसणाच्य पाकळ्या, 5-6 कप पाणी, कोथिंबीर, चिमूटभर काळे मिरीपूड,  आणि चवीपुरती मीठ घ्यावं. 

कोबीचं सूप करताना कोबी बारीक चिरावा, सोबतच सर्व साहित्य बारीक चिरुन घ्यावं. एक मोठ्या भांड्यात पाणी घालून त्याला उकळी आणावी. त्यात  मीठ, मिरेपूड, कोथिंबीर सोडून सर्व साहित्य घालावं. भांड्यावर झाकण ठेवावं. मध्यम आचेवर 10-15 मिनिटं भाज्या शिजू द्याव्यात. भाज्या शिजल्यावर गॅस बंद करण्याआधी त्यात काळे मिरी पूड, कोथिंबीर आणि मीठ घालून सूप चांगलं ढवळून घ्यावं आणि गॅस बंद करावा. गरम गरम सूप प्यावं.

Image: Google

भाज्या घालून पास्ता सूप ( व्हेजिटेबल पास्ता सूप)

भाज्या, कडधान्यं, मसाले आणि पास्ता घालून केलेलं हे सूप पिल्यानं पोट भरतं आणि वजनही कमी होतं. वजन कमी करण्यासाठी भरगच्च अन चविष्ट अशा या सूपला दुसरा पर्यायच नाही .

 Image: Google

भाज्या घालून पास्ता सूप करण्यासाठी अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर, अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची, 1  बारीक चिरलेला कांदा, 4 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या, 2 टमाटे बारीक चिरलेले, अर्धा कप गव्हाचा पास्ता, अर्धा कप भिजवून उकडून घेतलेले छोले, 2 मोठे चमचे टमाटा केचप, 1 छोटा चमचा तुळशीची पावडर, दालचिनीचे तुकडे, 1 छोटा चमचा मिरी पूड्,  चिल्ली फ्लेक्स, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे ऑलिव्ह तेल घ्यावं. 

भाज्या घालून पास्ता सूप तयार करण्यासाठी सर्व भाज्या बारीक चिरुन घ्याव्यात. आवश्यक असलेले मसाले बाजूला काढून ठेवावेत. छोले उकडून घ्यावेत. कढईत ऑलिव्ह तेल घालून ते गरम करावं. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण घालून घालून ते परतून घ्यावं.  कांदा गुलाबीसर झाला की त्यात बारीक चिरलेले गाजर, शिमला मिरची, टमाटा, उकडलेले छोले, टमाटा केचप घालावं. हे सर्व् नीट फोडणीत एकत्र करावं. नंतर यात दालचिनी,  हळद आणि आवश्यक तेवढं पाणी घालून ते कढईवर झाकण ठेवून शिजवावं. भाज्या शिजल्या की त्यात पास्ता घालावा. पास्ता या पाण्यात 10-12 मिनिटं उकळून शिजवून घ्यावा.  गॅस बंद करण्याआधी त्यात मिरीपूड, चिल्ली फ्लेक्स, तुळस पावडर आणि मीठ घालून सूप चांगलं हलवून घ्यावं. हे सूप गरम गरम प्यावं.

Image: Google

ओट्स सूप

वजन कमी करण्यासाठी ओट्स हे उपयुक्त असतात.  डोसे, इडली, उपमा याप्रमाणे ओट्सचं सूप केलं जातं आणि ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. 

Image: Google

ओट्स सूप करण्यासाठी 2 लहान चमचे ऑलिव्ह तेल,  7-8 लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या, 1 इंच आलं बारीक कापलेलं, 2 मोठे चमचे बारीक चिरलेली कांदा पात, अर्धा बारीक चिरलेला कांदा, पाऊण कप ओट्स, 2 कप बारीक चिरलेले गाजर, सिमला, टमाटा , 4 कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, काळे मिरी पूड, 1 लहान चमचा मिक्स हर्ब्स, अर्ध्या लिंबाचा रस घ्यावा. 

ओट्स सूप तयार करताना आधी कढईत ऑलिव्ह तेल गरम करावं. त्यात बारीक चिरलेला लसूण,आलं, पातीचा कांदा घालून तो परतून घ्यावा. हे परतल्यावर कांदा घालून तो परतावा. कांदा परतला गेला की त्यात ओट्स घालून ते एक मिनिट परतून घ्यावेत. नंतर त्यात बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात. त्या नीट मिसळून  घेतल्या की त्यात पाणी घालून ते नीट ढवळून घ्यावं. नंतर त्यात चवीनुसार मीठ घालावं. मिश्रण दहा मिनटं मध्यम आचेवर उकळू द्यावं. ओट्स शिजले की त्यात मिरे पूड, मिक्स हर्ब्स, लिंबाचा रस घालावा. गॅस बंद करण्याआधी त्यात थोडा आणखी पातीचा कांदा घालावा. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजनाआरोग्य