Join us  

उपवास करताना ४ चुका करताय? ॲसिडिटी-कॉन्स्टिपेशन होऊन हमखास बिघडते तब्येत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 6:02 PM

उपवास म्हणजे कमी खाणं, पण ते राहिलं बाजूलाच सोशल मीडियावरच्या उपवास ‌थाळ्यांचे फोटोच व्हायरल.

ठळक मुद्देउपवास करायला हरकत नाही पण तो समजून उमजून करणं, स्वत:च्या शरीराला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. 

राजश्री कुलकर्णी ( एम.डी. आयुर्वेद)

चातुर्मास सुरु आहे. श्रावणाचे दिवस. या दिवसात उपासतापास यांचंही महत्व आपल्याकडे मोठं आहे. खरं म्हणजे उपवास हा शब्द उप आणि वास या दोन शब्दांपासून तयार झाला आहे. याचा अर्थ आहे परमेश्वराच्या जवळ बसून त्याची अधिक उपासना,आराधना करणं! हे करण्यासाठी जास्त वेळ मिळावा, स्वैपाक पाणी, खाणं पिणं यात वेळ जाऊ नये म्हणून कमी खाणं, एकच वेळ खाणं ,केवळ दूध किंवा फळं घेणं हे अपेक्षित होतं पण झालं भलतंच! आता लोक सोशल मीडियात अनेक पदार्थांच्या उपवास ‌थाळ्या करुन टाकतात. उपवासाला ‘इतकं’ खाणं काही सोयीचं नाही. त्यानं तब्येतीला त्रासच होतो. उपवास म्हणजे खरंतर लंघन. लंघन म्हणजे काही न खाता काही काळ पचनसंस्थेला आराम देणं, दोष शरीराबाहेर निघून जाण्यासाठी मदत करणं, पचनशक्तीवर रोजच्या खाण्यामुळे, तो पचवण्यामुळे येणाऱ्या ताणातून काही वेळ मुक्ती देणं! हा विचार अतिशय शास्त्रीय आहे. रोजचा साधा आहार घेतला तरी तो पचवण्यासाठी शरीराला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून लंघन करायला हवं . त्यामुळे शरीरातील दोष नियंत्रणात राहतात. उपवास करायला हरकत नाही पण तो समजून उमजून करणं, स्वत:च्या शरीराला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे.

(Image : Google)

उपवासाला काय करु नये?

१. पचायला जड असणारे साबुदाणा, शेंगदाणो रताळ्याच्या गोड काचऱ्या, साबुदाणा वडे, तळलेले बटाटा पापड,चिप्स,चकल्या,चिवडा हे खाऊ नये.

२. साबुदाणा हा पचायला अतिशय अवघड असणारा असा कृत्रिम पद्धतीनं बनवलेला स्टार्च आहे, त्यामुळे खिचडी खाल्ल्यावर पोट जड होणं, गॅसेस होणं, दुसऱ्या दिवशी कॉंस्टीपेशन होणं इतकंच नव्हे तर काही जणांना संडास मधून रक्त पडणं इतके वेगवेगळ्या स्वरूपाचे त्रस होऊ शकतात.

३. शेंगदाणे हे पित्तवर्धक आहेत आणि उपासाच्या प्रत्येक पदार्थांत त्यांचा मुबलक वापर केला जातो,त्यामुळे ज्यांची प्रकृती मुळात पित्त प्रधान आहे. त्यांना उपासाच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी डोकं दुखणं, मळमळ, उलट्या होणं,अंगावर पित्त उठणं, छातीत,पोटात,घशात आग होणं,जुलाब होणं अशा तक्रारी उद्भवतात, त्यामुळे शेंगदाण्याचा वापर मर्यादित असावा.

४. सोशल मीडियावर मोठं मोठया थाळ्या भरून उपासाचे पदार्थ बनवलेले फोटो अपलोड केलेले आपण बघतोच! यात तिखट, गोड पदार्थ, फळं, सुका मेवा, तळलेले उपासाचे पदार्थ, मिठाया,खिरी अनेक गोष्टींचा समावेश होतो. हे सगळं टाळलं पाहिजे. नाहीतर नक्की त्रास होतो.

( लेखिका आयुर्वेद तज्ज्ञ आहेत.)

 

टॅग्स :आरोग्य