सदोष जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीराला अजिबातच व्यायाम नसणं या कारणांमुळे वजन वाढण्याची (weight gaining) समस्या निर्माण होते. पण काल वजन कमी होतं आणि सकाळी उठल्यानंतर अचानक वाढलं असं होत नाही. शरीर वजन वाढण्याची लक्षणं (signs of weight gaining) दाखवत असतं, पण त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपण आपल्या सवयी बदलतच नाही. परिणामी वजन वाढतं. वजन वाढण्यासोबतच इतर गंभीर आजार होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच तज्ज्ञ वजन वाढीच्या लक्षणांकडे जागरुकपणे बघण्याची गरज व्यक्त करतात.
Image: Google
वजन वाढीची लक्षणं
1. सतत थकल्यासारखं वाटणं
काही विशेष काम न करताही खूप थकल्यासारखं वाटणं हे वजन वाढण्याचं लक्षण आहे. यामुळे झोपेवरही परिणाम होतो. झोप नीट न झाल्यानं दिवसभर आळसावल्यासारखं वाटतं. वजन वाढत असल्यास काम करण्याची क्षमता कमी होते. शरीराची कमी झालेली ऊर्जा हे वजन वाढण्याचं लक्षण आहे.
2. सारखी भूक लागणं
नेहेमीपेक्षा अधिक भूक लागणं. खाल्ल्यानंतरही थोड्या वेळानं भूक लागणं, सतत भूक लागणं, खाल्ल्यानंतरही खाण्याचं समाधान न होणं ही भुकेच्या संदर्भातली लक्षणं वजन वाढीचे संकेत देतात. 'पब मेड'ने यावर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात की भुकेची ही लक्षणं दीर्घ काळ राहिल्यास वजन वेगानं वाढतं.
3. श्वास घेण्यास त्रास होणं
थोडंसं चाललं तरी धाप लागणं हे वाढत्या वजनाचंच लक्षण आहे. वजन वाढत असल्या कारणानं छातीच्या आसपास चरबी जमा होते. त्याचा परिणाम म्हणजे श्वास घेण्यास त्रास होतो.
4. भीती वाटणं, चिडचिड होणं
वजन वाढत असल्यास त्याचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नोलाॅजी इंफर्मेशन'नुसार वजन वाढल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त होतं. चयापचय क्रिया बिघडते. त्याचा शारीरिक क्रियांवर परिणाम होवून यामुळे भीती वाटणं, चिडचिड होणं या मानसिक समस्या निर्माण होतात.
Image: Google
वजन वाढतं कारण
1. 'पब मेड'ने केलेला अभ्यास सांगतो की, चरबीयुक्त पदार्थ खाणं, जंक फूडस खाणं, जास्त गोड खाणं यामुळे वजन वाढत. सतत खाण्याची सवय यालाच फूड ॲडिक्शन असं म्हणतात. खाण्याचं व्यसन हे अल्कोहोल आणि धूम्रपानाच्या व्यसना इतकंच घातक असतं. त्यामुळे तज्ज्ञ खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतात. सतत खाण्याच्या व्यसनामुळे वजन वाढतं आणि वाढत्या वजनामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
2. 'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फाॅरमेशन'नं केलेलं संशोधन सांगतं की, ॲण्टि डिप्रेशनवरील गोळ्या आणि मधुमेहावरील औषधांमुळे वजन वाढू शकतं. या औषधांचा परिणाम शारीरिक क्रियांवर होतो तसेच यामुळे चयापचय क्रिया संथ होते. यामुळे सतत भूक लागून जास्त खाल्लं जातं आणि वजन वाढतं.