Join us  

रोज करा फक्त 'या' ४ गोष्टी, व्यायाम न करताही वाढलेलं वजन येईल नियंत्रणात, राहाल फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2023 2:58 PM

4 ways you can lose weight apart from exercise : जीवनशैलीतील इतर काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास व्यायाम न करताही आपण वजन कमी करु शकतो.

वजन कमी करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. कारण त्यासाठी भरपूर व्यायाम करावा लागतो.  आहारावर प्रमाणापेक्षा जास्त नियंत्रण ठेवणे अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात असं सगळं आपल्याला वाटत असतं. पण वजन कमी करण्यासाठी फक्त इतकंच करावं लागतं असं नाही. तर वजन वाढण्यामागे आणि ते कमी होण्यामध्ये इतरही बऱ्याच गोष्टी कारणीभूत असतात. ज्याचा आपण एरवी फारसा विचार करत नाही. व्यायाम आणि आहार या गोष्टी महत्त्वाच्या असतातच पण त्याबरोबरच जीवनशैलीतील इतर काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास व्यायाम न करताही आपण वजन कमी करु शकतो (4 ways you can lose weight apart from exercise). 

व्यायाम करणे उत्तम आरोग्यासाठी चांगले असतेच. त्यामुळे मानसिक, शारीरिकरित्या आपण चांगेल राहतो, हे खरेच आहे. पण अनेकदा नोकरी, घरातील जबाबदाऱ्या आणि इतर गोष्टींमुळे महिलांना व्यायामाला जायला वेळ मिळतोच असे नाही. अशावेळी वजन कमी करायचे असल्यास इतर काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. पण या इतर गोष्टी कोणत्या ते आपल्याला कळत नाही. आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ यासाठीच काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात त्या कोणत्या समजून घेऊया...

१. झोप

व्यायाम आणि आहारासोबतच झोप ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. झोप कमी झाली तर शरीरातील कोर्टीसोल या हॉर्मोनची पातळी वाढते आणि त्याचा परीणाम म्हणजे लठ्ठपणा वाढतो. झोप नीट झाली तर शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत होतात आणि त्यामुळे शरीरावर ताण न आल्याने वजन वाढ होण्याची समस्या उद्भवत नाही. 

२. साखर असलेली पेय 

बरेचदा आपण चहा, कॉफी, फळांचे ज्यूस, कॅनमधले ज्यूस अगदी सहज घेतो. पण यामुळे आपल्या शरीरातील इन्शुलिनचे प्रमाण वाढते आणि पोटवर किंवा कंबरेवर अनावश्यक चरबी वाढण्यास हे कारणीभूत ठरते. 

३. ताणतणावांचे नियोजन 

पोटावर चरबी वाढण्याचे किंवा एकूणच लठ्ठपणाचे आणखी एक महत्त्वाचे कारण हे वाढते ताण हे आहे. सगळ्याच क्षेत्रात आणि वयोगटात स्पर्धा वाढल्याने आजकाल प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या ताणतणावात असल्याचे दिसते. हा ताण दूर ठेवण्यासाठी मुद्दाम काही गोष्टी करणे आवश्यक आहे. 

४. आहारात प्रोटीन वाढवणे 

आहारात प्रोटीन जास्तीत जास्त असायला हवे. कारण प्रोटीन हे शरीराला अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असते. प्रोटीनमुळे आपला मेटाबॉलिक रेट वाढण्यास मदत होते आणि आरोग्य चांगले राहते.  लठ्ठपणा नियंत्रणात राहण्यास त्याची चांगली मदत होते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइल