एखादे निसर्गरम्य ठिकाण, भुरभुरणारा पाऊस आणि त्यांच्या जोडीला गरमागरम भुट्टा म्हणजे मक्याचं कणीस... असे चित्र आपल्याकडे नेहमीच दिसून येते. हौस आणि आवड म्हणून आपण स्वीटकॉर्न खात असलो, तरी नकळतपणे त्याचे आपल्या आरोग्यावर अनेक चांगले परिणाम होत असतात. ॲण्टी ऑक्सिडंट्स सोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत म्हणून स्वीटकॉर्न ओळखले जाते. त्यामुळे पावसाळ्यात मुबलक प्रमाणात मिळणारे स्वीटकॉर्न आवर्जून खा आणि मान्सून एन्जॉय करा.
मक्याचे हे काही फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत
१. दात होतात मजबूत
दातांचे आरोग्य सांभाळण्यासाठी काही मोजकेच घटक खूप उपयुक्त ठरत असतात. या घटकांपैकीच एक आहे स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न खाल्ल्यामुळे दात खूपच मजबूत होतात. त्यामुळे लहान मुलांनाही पावसाळ्यात स्वीटकॉर्न खायला दिले पाहिजे. पण दातांच्या आरोग्यासाठी भाजलेले कणीस दातांनी तोडून खाणे गरजेचे आहे.
२. मुतखड्याचा त्रास होतो कमी
ज्या लोकांना मुतखडा म्हणजेच किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांनी पावसाळ्यात मका खाणे कधीच चूकवू नये. भाजून, उकडून किंवा त्याचे सुप करून अशा कोणत्याही पद्धतीने स्वीटकॉर्न पोटात गेले, तरी ते मुतखड्याचा आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
३. गर्भवतींसाठी उपयुक्त
मक्यामध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. गर्भवती महिलांना अगदी पहिल्या महिन्यापासूनच डॉक्टर फॉलिस ॲसिडच्या गोळ्या घ्यायला सांगत असतात. त्यामुळे फॉलिक ॲसिडचा हा नॅचरल सोर्स कधीही चूकवू नका. फॉलिक ॲसिडमुळे कर्करोगाचाही धोका कमी होत असतो.
४. सौंदर्य वाढविण्यासाठी खा स्वीटकॉर्न
वयोमानानुसार चेहऱ्यामध्ये होणारे बदल रोखायचे असतील किंवा कमी करायचे असतील, तर ज्या पदार्थांमध्ये ॲण्टी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत, असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. स्वीटकॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणावर ॲण्टी ऑक्सिडंट्स आढळून येतात. स्वीटकॉर्न जर शिजवून खाल्ले तर त्यातील ॲण्टी ऑक्सिडंट्सचे प्रमाण दुपटीने वाढते. त्यामुळे सौंदर्यवाढीचा उपाय म्हणूनही स्वीटकॉर्न खाण्यास विसरू नये.
५. ॲनिमियाच्या रूग्णांसाठी वरदान
ॲनिमियाच्या रुग्णांसाठी स्वीटकॉर्न खूपच फायदेशीर असते. मॅग्नेशियम, लोह, कॉपर, विटामिन बी, फॉस्फरस असे अनेक घटक स्वीटकाॅर्नमधून मिळतात. त्यामुळे अशक्तपणा आणि ॲनिमियाचा त्रास कमी होतो. ॲनिमियाच्या रूग्णांसाठी स्वीटकॉर्न म्हणजे वरदान आहे.