आहारात शेवग्याच्या शेंगांना आरोग्यदृष्ट्या महत्व आहे. शेवग्याची मसाल्याची भाजी, आमटी, वरण, पिठलं या विविध प्रकारे शेवग्याचा समावेश आहारात करता येतो. आरोग्याचा विचार करता केवळ शेंगाच नाही तर शेवग्याच्या पानांनाही महत्व आहे. शेवग्याच्या पानांचा समावेश औषधांमध्ये केला जातो. शेवग्याच्या शेंंगाच्या भाज्यांचे प्रकार जसे चविष्ट लागतात तसेच शेवग्याच्या पानांंचे पराठेही उत्तम लागतात. आरोग्याच्या दृष्टीनं शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्याने फायदे होतात.मधुमेह, स्थूलता, दमा या समस्यांनी ग्रस्त रुग्णांसाठी शेवग्याच्या पानांचे पराठेखाणं म्हणजे एक प्रकारचा औषधी उपचार आहे. शेवग्याच्या पानातून प्रथिनं, खनिजं आणि जीवनसत्वं मोठ्या प्रमाणात मिळतात. या पानांमध्ये असलेले ॲण्टिऑक्सिडण्टस पेशींचं होणारं नुकसान रोखतात. त्यामुळेच शेवग्याच्या पानांचे पराठे खाण्याला महत्व आहे.
Image: Google
शेवग्याच्या पानांच्या पराठ्यांचे फायदे
1. डोळ्यांच्या आरोग्यासाठी शेवग्याची पानं फायदेशीर असतात. यातील ॲण्टिऑक्सिडण्टमुळे दृष्टी चांगली होते. शेवग्याच्या पानांचे पराठे वरचेवर आहारात असल्यास डोळ्यांशी निगडित समस्यांवर आराम मिळण्यास फायदा होतो.
2. शेवग्याच्या पानांमध्ये संत्र्याच्या दुप्पट क जीवनसत्वं असतं. शेवग्याच्या पानांचा पराठा खाल्ल्यानं शरीरास क जीवनसत्वं मिळतं तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. शेवग्याच्या पानांचं सेवन केल्यानं पेशींचा होणारा ऱ्हास थांबतो.
Image: Google
3. हाडं मजबूत करण्यासाठी, आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे पराठे खाणं फायदेशीर असतं. शेवग्याच्या पानात प्रथिनं, फाॅस्फरस, कॅल्शियम यांचं प्रमाण भरपूर असतं. शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्यानं ऑस्टियोपोरोसिस, संधिवात यासाख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो. या समस्या असल्यास यावर शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्याने फायदाही मिळतो.
4. पोषणाच अभाव, असंतुलित आहार , वेळीअवेळी जेवण याप्रकारच्या जीवनशैलीमुळे वजन वाढतं. वजन कमी करण्यासठी आहारात शेवग्याच्या पानांचे पराठे असावेत. शेवग्याच्या पानांचे पराठे खाल्ल्याने सारखी भूक लागत नाही.
5. फुप्फुसाच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या पानांचा पराठा फायदेशीर ठरतो. दम्याच्या विकारात श्वास घेण्यास होत असलेला त्रास कमी करण्यासाठी शेवग्याच्या पानांचा पराठा खाण्याचा सल्ला दिला जातो.
Image: Google
कसा करायचा शेवग्याच्या पानांचा पराठा?
शेवग्याच्या पानांचे पराठे करण्यासाठी गव्हाचं पीठ, हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बेसन पीठ, चिरलेली शेवग्याचा पाला, कोथिंबीर, हळद, जिरे पावडर, आलं आणि चवीनुसार मीठ घ्यावं.
शेवग्याचा पाला आणि कोथिंबीर धुवून बारीक चिरुन घ्यावं. कांदा बारीक चिरुन घ्यावा. आलं मिरचीची पेस्ट करावी. हे सर्व कणकेत घालावं. कणकेत थोडं तेल घालावं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावं. पीठ अर्धा तास मुरु द्यावं. नंतर पिठाचे छोटे गोळे करुन त्याचे पराठे लाटावेत आणि तूप किंवा तेल लावून शेकून घ्यावेत.