जेवणात सॅलेड ही साइड डिश नसून मुख्य डिश असावी असं पोषण तज्ज्ञ सांगतात. सॅलेड खाल्ल्याने वजन कमी होण्यासोबतच पोषणाशी निगडित विविध फायदे सॅलेड खाल्ल्याने होतात. निरोगी राहाण्यासाठी रोजच्या जेवणात सॅलेड खाण्याला महत्व आहे. सॅलेडचे विविध प्रकार आहेत. त्यात ग्रीन सॅलेडचं महत्त्व विशेष आहे,. ग्रीन सॅलेडमध्ये हिरव्या भाज्या, पालेभाज्या, काकडी, सिमला मिरची, सोबत गाजर, टमाटा आणि कांदा या भाज्यांचा समावेश केला जातो. या विविध भाज्यांच्या गुणधर्माचा एकत्रित परिणाम म्हणजे ग्रीन सॅलेड शरीरातील पोषणाची कमतरता भरुन काढण्यास मदत करतं.
Image: Google
का खावं ग्रीन सॅलेड?
1. ग्रीन सॅलेड हे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. ग्रीन सॅलेडमध्ये अ, ब1, ब6, क ही जीवनसत्वं, लोह, पोटॅशियम ही ख्निजं असतात. ग्रीन सलाडमध्ये 90 टक्के पाण्याचा अंश असतो. ग्रीन सलाडमध्ये काकडीच समावेश करायलाच हवा असं तज्ज्ञ म्हणतात. काकडीमुळे पोटाच्या विविध समस्यांना आराम मिळतो . काकडी घातलेलं ग्रीन सॅलेड जेवणात खाल्ल्याने उन्हाळ्यात किंवा एरवीही शरीरात पाण्यची कमतरता निर्माण होत नाही.
2. ग्रीन सॅलेडमध्ये पत्ता कोबी, पालक यासारख्या हिरव्या भाज्या आणि पालेभाज्यांचा समावेश असतो. या भाज्यांमुळे थकवा दूर होतो. ग्रीन सलाड खाल्ल्याने बी 12 या जीवनसत्वाचा लाभ होतो. ग्रीन सलाडच्या या गुणधर्मामुळे थकवा तर दूर होतोच शिवाय मूडही चांगला होतो.
Image: Google
3. पोटाचं आरोग्य चांगलं राहाण्यासाठी फायबरची गरज असते. ग्रीन सॅलेडमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं हे सलाड खाल्ल्यानं बध्दकोष्ठतेची समस्या असल्यास ती दूर् होते. पचन सुधारतं, पोट फुगणं, पोटात वायू धरणं हे त्रास होत नाही.
4. पोषण तज्ज्ञ म्हणतात जेवणात एक वाटीभर ग्रीन सॅलेड खायलाच हवं. या ग्रीन सॅलेडमुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहातं. ग्रीन सॅलेड करताना गाजर टाकल्यास बीट केरोटिन नावाचं जीवनसत्व ग्रीन सॅलेड खाऊन मिळतं. या जीवनसत्वामुळे दृष्टी सुधारते. ग्रीन सॅलेडमध्ये ॲण्टिऑक्सिडण्टेस भरपूर प्रमाणात असतात. ग्रीन सॅलेड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते. एक वाटीभर ग्रीन सॅलेड खाल्ल्याने मधुमेह, कर्करोग् यासारख्या आजारांचा धोका टळतो.
Image: Google
कसं करावं ग्रीन सॅलेड?
ग्रीन सॅलेड करण्यासाठी बारीक चिरलेली पत्ताकोबी, पालक, 1 सिमला मिरची उभी कापलीली, 2 गाजर बारीक चिरलेले, काकडी बारीक चिरलेली, ब्रोकोली, घेवडा, 1/2 टमाटे बारीक चिरलेलेले, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 छोटे चमचे व्हिनेगर, 1 छोटा चमचा मध, चवीनुसार मीठ, ओबड धोबड कुटलेले काळे मिरे आणि वाटीभर दही घ्यावं.
ग्रीन सॅलेड करताना सर्व भाज्या धुवून बारीक चिरुन घ्याव्यात. दही, काळे मिरे, मध आणि व्हिनेगर एकत्र करुन मिक्सरमधून फिरवून घ्यावं. कापलेल्या भाज्या फ्रिजमध्ये ठेवून गार कराव्यात. थोडा वेळानं फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या काढून त्यात दह्याचं मिश्रण घालून सॅलेड व्यवस्थित हलवून घ्यावं. सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की ग्रीन सॅलेड तयार होतं.