Join us  

५ चुकीच्या सवयी ज्यामुळे वाढतं तुमचं वजन आणि पोटाची चरबी, वेळीच बदला नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2023 5:51 PM

5 Daily Habits that are making you Gain Weight & Belly Fat : रोजच्या व्यवहारातील काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिल्यास वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

आपलं वजन खूप जास्त वाढलेलं असेल किंवा आपल्या शरीरावर प्रमाणापेक्षा जास्त चरबी असेल तर आपल्याला अस्वस्थ होतं. उठणं, बसणं किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिया करणे जास्त वजनामुळे अवघड जातं. पण हेच जर वजन आटोक्यात असेल तर मात्र आपण सगळ्या हालचाली अतिशय सहजरित्या करु शकतो. वजन वाढायला फार वेळ लागत नाही. पण वजन कमी करणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणाचे नियोजन या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पण वजन वाढू नये यासाठी रोजच्या व्यवहारातील काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. द योगा इन्स्टीट्यूटच्या प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर हंसाजी राजेंद्र यांनी हे बदल कोणते त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या असून त्या कोणत्या पाहूया (5 Daily Habits that are making you Gain Weight & Belly Fat)...

१. खूप वेगाने खाणे 

अनेकदा आपण ऑफीसमध्ये किंवा घरातही घाईत असतो. अशावेळी आपण घाईगडबडीत खूप वेगाने अन्न खातो. आपण घाईत खाल्ले तर आपल्या मेंदूला पोटाकडून पोट भरले आहे की नाही याची सूचना मिळत नाही. त्यामुळे पोट भरले असले तरी आपण जास्त प्रमाणात खात राहतो. याचा परीणाम म्हणजे जास्तीच्या अन्नाचे चरबीत रुपांतर होते आणि वजनवाढ होते. 

(Image : Google)

२. प्रमाणाबाहेर डाएटींग 

वजन कमी करायचे म्हणून तुम्हीही प्रमाणाबाहेर अवघड असे डाएट प्लॅन फॉलो करत असाल तर त्यामुळे वजन कमी न होता उलट वाढते. वजन कमी करण्यासाठी किंवा स्लीम दिसण्यासाठी जास्त लक्ष दिल्यास त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. शरीराला चांगले पोषण न मिळाल्याने शरीरात काही हॉर्मोन्स किंवा द्रव्यांची निर्मिती होते आणि त्यामुळे वजन वाढते. त्यामुळे बॅलन्स डाएट घेण्याकडे आपला कल असायला हवा. 

३. कमी झोप घेणे 

विविध कारणांमुळे सध्या झोप अपूर्ण होण्याच्या प्रमाणात वेगाने वाढ झाली आहे. पण कमी झोपेचा आपल्या जाडीवर परीणाम होतो आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता जास्त असते. झोप नीट झाली नसेल तर तुम्हाला सतत भुकेले वाटत राहते. अशावेळी सामान्यपणे चुकीचा आहार घेण्याकडे कल वाढतो आणि त्यामुळे वजन प्रमाणाबाहेर वाढते. 

४. गोड पेय

अनेकदा आपण शीतपेये, कोल्ड कॉफीसारखी पेये किंवा फळांचे ज्यूस, एनर्जी कॅनमधील ज्यूस घेतो. हे ज्यूस आरोग्यासाठी फायदेशीर असतात असा आपला समज असतो. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि प्रिझर्वेटीव्हज असतात ज्याचा आपल्या शरीरावर परीणाम होतो आणि हे पदार्थ लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरतात. 

५. फायबर कमी प्रमाणात घेणे 

आहारात फायबरचे प्रमाण जास्तीत जास्त असायला हवे. फायबरमुळे पोट लवकर भरते आणि त्यामुळे कॅलरीज कमी प्रमाणात घेतल्या जातात. त्यामुळे आहारात जास्तीत जास्त फायबर घेतल्यास लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. यामध्ये फळं, भाज्या, डाळी, धान्य, बिया यांसारख्या गोष्टी घेतल्यास त्याचा वजन कमी होण्यासाठी चांगला फायदा होतो.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइल