सतत बैठं काम, व्यायामाला वेळ नाही आणि कितीही ठरवलं तरी डाएटवर न राहणारे नियंत्रण यांमुळे आपले वजन दिवसेंदिवस वाढत जाते. इतकेच नाही तर या सगळ्यात पोटाचा, मांड्यांचा, कंबरेचा घेर वाढत जातो. आरोग्याच्या दृष्टीनेही आपण असे जाड होणे योग्य नसते. यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग किंवा इतर समस्या भेडसावू शकतात. इतकेच नाही तर शरीर बेढब वाढले तर त्याचा आपल्या दिसण्यावरही परीणाम होतो. त्यामुळे आत्मविश्वास कमी होणे, नैराश्य येणे या समस्यांमध्ये वाढ होते. म्हणून एकूणच सगळ्याच दृष्टीने आपण फिट अँड फाईन असणे केव्हाही चांगले. पोटाच्या भागात लवकर चरबी वाढते आणि साठत जाते. मात्र ती कमी करायची म्हटली की काय करावे आपल्याला सुचत नाही. मात्र ही पोटावरची चरबी घटवण्यासाठी काही नेमके व्यायाम करणे अतिशय आवश्यक असते. प्रसिद्ध आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र पोटावरची चरबी कमी करण्यासाठी काही नेमके उपाय सांगतात. अवघ्या ५ मिनीटांत होणारे हे योगा कोणते ते पाहूया (5 Minute Easy Yoga for Flat Belly at Home)...
१. ताडासन
दे आसन दोन पद्धतींनी करता येते. दोन्ही पायाच्या चौड्यांवर उभे राहून एक हात कानाच्या दिशेने सरळ वर घ्यायचा आणि शरीर ताणायचे. पुन्हा खाली येऊन दुसरा हात वर घेऊन पुन्हा शरीर ताणायचे. यानंतर दोन्ही हात एकावेळी वरच्या बाजुला घेऊन ताणायचे.
२. कोनासन
दोन्ही पायात अंतर घेऊन हात खांद्याच्या रेषेत सरळ घ्यायचे. कंबरेतून खाली वाकत डावा हात उजव्या पायापाशी टेकवण्याचा प्रयत्न करायचा. नजर वरच्या बाजूला उजव्या हाताकडे ठेवायची. असेच दुसऱ्या हातानेही करायचे.
३. वज्रासन
हे अतिशय सोपे आसन असून नेहमी मांडी घालून बसण्यापेक्षा वज्रासनात बसणे पोटाच्या आरोग्यासाठी केव्हाही फायदेशीर ठरते. या आसनात डोळे मिटून चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा.
४. पर्वतासन
मांडी घालून बसावे आणि दोन्ही हात बाजुने डोक्यावर घेऊन हातांचा नमस्कार घालावा. हात वरच्या दिशेला ताणलेले राहतील असे पाहावे. हात आणि डोके समोर जमीनीला टेकवण्याचा प्रयत्न करावा. पोट कमी होण्यासाठी या आसनाचा चांगला फायदा होतो.
५. पवनमुक्तासन
या आसनातच त्याचा अर्थ दडलेला आहे. पोटातील वायू निघून जाण्यासाठी हे आसन अतिशय फायदेशीर ठरते. पाठीवर झोपून दोन्ही गुडघे पोटावर दाबून घ्यावेत. यामुळे पोटातील वात निघून जाण्यास मदत होते.