वजन कमी करणं हे खरंच अवघड असतं का? आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अजिबात नाही. कारण आयुर्वेद वजन आणि आपली दीनचर्या, वजन आणि आपला आहार विहार यांना स्वतंत्रपणे पाहात नाही. वजन कमी करायचं असेल तर आपल्या रोजच्या दिनचर्येला, आहार-विहाराला आरोग्यदायी नियम लावून घेतले की वजन करणं हे काम अवघड होत नाही. यापध्दतीने एकीकडे वजन कमी होत असतं आणि दुसर्या बाजूला आपलं शरीर खूप काही कमवत असतं. आयुर्वेदाच्या दृष्टीने वजन कमी करण्यासाठीचे पाच सर्वसाधारण नियम आहेत. पण तेच मुलभूत असून ते जर पाळले तर वजन हमखास कमी होईल असं आयुर्वेद मानतं. काय आहेत हे नियम?
छायाचित्र: गुगल
1. रात्री नाही तर दिवसा पोटभर जेवा.
सकाळची वेळ घाईची, दुपारची वेळ ही कामाची. त्यामुळे या वेळेत पटकन जेवण उरकण्यावर भर असतो. जे काही वेगळं, स्पेशल करायचं ते रात्री. डाळ-भात, पोळी -भाजी कोशिंबिरीसारखं संपूर्ण जेवण करायचं ते रात्री अशी अनेकांची सवय असते. पण आयुर्वेद म्हणतं हीच चुकीची सवय आहे. वजन वाढण्यास आणि अनारोग्यास ही सवय खतपाणी घालते ती आधी बदलायला हवी. आयुर्वेद म्हणतं की, रात्री ऐवजी दिवसा आरोग्यदायी आणि पोटभर आहार घ्यायला हवा. या वेळेत अधिक उष्मांक असलेला आहार घेतल्यास शरीराला त्यातील पोषक तत्त्त्व शोषून घेण्यास, अन्न पचवण्यास पुरेसा वेळ मिळतो. रात्री कमी उष्मांक असलेला आहार घेतल्यानं पित्त वाढत नाही, अपचन, जळजळ यासारख्या पचनाशी संबंधित समस्या निर्माण होत नाही. दुपारी जेवणात प्रथिनं, फॅटस, कबरेदकं या सर्व घटकांचा समावेश असायला हवा. सकाळी डाळ-भात, भाजी-पोळी, सलाड, वाटल्यास एखादा गोड पदार्थ हे सर्व खावं. जेवणाला पूर्तता आणण्यासाठी रोज दुपारच्या जेवणात साजूक तूप आणि घरी विरजलेलं दही खावं. वजन कमी करण्यासाठी उपाशी रहाण्याची गरज नसते. तर योग्यवेळी योग्य आहार योग्य प्रमाणात घेतल्यास त्याचा वजनावर आणि आरोग्यावर चांगला परिणाम होतो. रात्री कमी उष्मांक असलेला हलका आहार घ्यावा. वजन कमी करण्यासाठी आहाराचं हे पथ्यं नियमित पाळलं तर वजन नक्की कमी होतं असं आयुर्वेद सांगतं.
छायाचित्र: गुगल
2. कोमट पाणी प्या
वजन कमी करण्यासाठी आयुर्वेद दिवसभरात दोन ते तीन लिटर कोमट पाणी पिण्याचा सल्ला देते. कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. शिवाय कोमट पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. कोमट पाणी हे गार पाण्यापेक्षा शरीराला जास्त ओलसर ठेवतं. जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास कोमट पाणी पिल्यास भूक ही नियंत्रित राहाते. एकाच वेळेस खूप खाल्ल्यानेही वजन वाढतं. ही समस्या जेवणआधी कोमट पाणी पिल्यानं कमी होते.
छायाचित्र: गुगल
3. हर्बल काढे घ्यावेत
आयुर्वेदात अनेक हर्बल काढे सांगितलेले आहेत. ज्याच्या सेवनानं आरोग्य चांगलं राहातं. शरीराला पोषक घटक मिळतात, इतर आजारांवर त्याचा परिणाम होतो आणि वजनही झपाट्यानं कमी होतं. आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. मेथी दाणे अर्थात मेथ्या लालसर भाजून ठेवाव्यात. एक चमचा मेथी दाणे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घेतल्याने वजनावर परिणाम होतो. मेथ्यांमधे मोठ्या प्रमाणात तंतूमय घटक असतात. त्यामुळे मेथ्या अन्नाचं पचन करण्यास मदत करतात. त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. त्रिफला चूर्ण हे देखील वजन कमी करण्यासाठी उत्तम मानलं जातं. दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी घेतल्यास त्याचा फायदा पचनक्रियेवर होवून वजन कमी होण्यास मदत होते.
छायाचित्र: गुगल
4. घरी तयार केलेलं जेवण जेवा
सतत बाहेरचं खाणं ही सवय वजन वाढण्यास कारणीभूत असते. कारण बाहेरच्या पदार्थात उष्मांक, नुकसानदायी फॅटस जास्त असतात. त्या तुलनेत घरच्या जेवणातून योग्य मात्रेत उष्मांक असतात, तंतूमय घटक जास्त असतात. घरचं जेवण हे पचण्यास हलकं आणि आरोग्यदायीही असतं. आयुर्वेद म्हणतं की वजन कमी करण्यासाठी घरच्या जेवणात भाज्या, डाळी, ज्वारी, बाजरी, नाचणीसारखे धान्य हे जास्त प्रमाणात असायला हवं.
छायाचित्र: गुगल
5. दररोज व्यायाम आवश्यक
आयुर्वेदानुसार जेवल्यानंतर एकाच जागी बसून राहू नये. जेवल्यानंतर थोडं चालावं. तसेच रोज सकाळी कोणत्याही स्वरुपाचा व्यायाम न चुकता करावा. जास्त वेळ नसेल त्र किमान 15 मिनिटं योगातील वेगवेगळी आसनं करावीत किंवा नियमित 12- 15 सूर्यनमस्कार घालावेत. यामुळेही वजन कमी होण्यास मदत होते.
आयुर्वेदानं सांगितलेले हे नियम आपल्या अगदीच अपरिचयाचे आहेत असं नाही. पण सोपे नियम पाळण्याचाही आपण कंटाळा करतो आणि वजन वाढण्याची तक्रार तेवढी करत राहातो. त्यामुळे आयुर्वेद म्हणतं त्याप्रमाणे जाणते व्हा, नियम पाळा आणि वजन कमी करा! ठरवलं तर नक्कीच जमेल हे!