उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच जात आहे.. अजूनही शाळांना सुट्ट्या लागलेल्या नाही, त्यामुळे मुलांना दररोज उन्हात घराबाहेर पडावे लागत आहे. शाळा सुरू होण्याची किंवा सुटण्याची वेळ भर दुपारचीच. त्यामुळे मुलांना एकदा तरी उन्हाचा सामना (sun stroke) करावा लागतोय. ज्या मुलांना सुट्ट्या आहेत किंवा जी मुले घरीच असतात, त्यांना घरातही उन्हाच्या झळा (heat stroke) लागून त्रास होतोच.. म्हणूनच तर वाढत्या उन्हासोबत अनेक मुलं गळून गेली आहेत. कुणाला उलट्या, ताप, पोटदुखी असा ऊन लागल्याचा त्रासही सुरू झाला आहे. त्यामुळेच आता मुलांच्या आहारात काही बदल करणं गरजेचं आहे..
उन्हाळ्यात मुलांना द्यावेच असे ५ पदार्थ..
उन्हाळ्यात डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पाण्यासोबतच शरीरातील इतर आवश्यक घटकांचंही प्रमाण कमी होतं. यामुळे अशक्तपणा जाणवायला लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणूनच मुलांना हे काही पदार्थ आवर्जून खायला द्या... शाळेच्या डब्यातही तुम्ही हे पदार्थ देऊ शकता.
१. सातुचं पीठ
गहू आणि डाळी घालून तयार केलेलं सातुचं पीठ खऱ्या अर्थाने एनर्जी बुस्टर आहे. आपला हा पारंपरिक पदार्थ थोडासा खाल्ला तरी त्यातून भरपूर उर्जा मिळते. सातुच्या पीठात दूध आणि साखर टाका आणि तो लहान मुलांना खायला द्या. एका वर्षाच्या बाळालाही हा पदार्थ चालू शकतो. सातुचं पीठ शरीर थंड ठेवण्यास मदत करतं.
२. टरबूज
टरबूज म्हणजे उन्हाळ्यासाठी जणू काही वरदान. लहान मुलांना तहान- भुकेचं म्हणावं तेवढं भान नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून एरवीही कमी पाणी प्यायल्या जातं. उन्हाळ्यात शरीराची पाणी पातळी झपाट्याने कमी होते. अशावेळी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून मुलांना दरराेज टरबूज खायला द्या.
३. दही
दही हा शरीराला थंडावा देणारा घटक आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आहारातलं दह्याचं प्रमाण उन्हाळ्यात वाढवावं. दही साखर, दही भात किंवा आवडत असेल तर ताक अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना दही अवश्य खाऊ घाला. ताक दिलं तर ताकात जिरेपूड अवश्य टाका. कारण जीरे शरीराला थंडावा देतात.
४. लिंबू पाणी
शरीराची पाणी पातळी आणि ग्लुकोज कमी होऊ नये. म्हणून मुलांना उन्हाळ्यात एक दिवसाआड का असेना पण लिंबू पाणी द्या. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. जी मुलं शाळेत जातात. त्यांना लिंबू पाणी असलेली एक बॉटल शाळेत दिली तरी चालेल.
५. खडीसाखर
खडीसाखर देखील शरीराला थंडावा देते. त्यामुळे मुलांना उन्हाळ्यात दिवसातून एकदा खडीसाखरेचा तुकडा अवश्य चघळायला द्या.