Join us  

नाश्त्याला इडली चटणी खाण्याचे 6 फायदे, तज्ज्ञ सांगतात इडली-चटणी नाश्त्याला खाणं योग्य, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 3:32 PM

इडली चटणी आणि सांबार हे केवळ टेस्टीच नाहीतर  हेल्दी काॅम्बिनेशन आहे. एकाच वेळी आरोग्यास अनेक फायदे मिळवून देणारी इडली सकाळच्या नाश्त्याला खाण्याची काही विशेष कारणं आहेत. 

ठळक मुद्देइडली ही लो कॅलरी डाएट म्हणून ओळखली जाते.सकाळच्या नाश्त्याला इडली चटणी खाल्ल्याने ह्र्दयाशी संबंधित आजारांचा धोका टळतो.इडलीसोबत चटणी आणि भाज्या घातलेल तुरीच्या डाळीचा सांबार खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फायबर आणि आवश्यक ॲसिड आणि विकर एकाच वेळी मिळतात.

हलकी फुलकी इडली पूर्वी बाहेर हाॅटेल आणि रेस्टाॅरण्टमधे मोठ्या आवडीनं खाल्ली जायची. पण पूर्वीच्या तुलनेत आपल्या आहारात इडलीचं प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलं आहे, कारण आता इडली केवळ हाॅटेलमधेच नाहीतर घरोघरी होते. झटपट होणारा हा पदार्थ कोणी सकाळच्या नाश्त्याला तर कोणी दुपारच्या जेवणात खातात किंवा रात्री काहीतरी लाइट हवं म्हणून रात्रीच्या जेवणासाठी करतात.

Image: Google

आता इडलीचे विविध प्रकार केले जातात. पारंपरिक इडलीसोबत इडलीचे झटपट प्रकारही लोकप्रिय आहेत. घरातल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांना चव बदल म्हणून इडली चटणी किंवा इडली सांबाराचा बेत केला जातो. इडली खाण्याची ज्याची त्याची आवड वेगळी असली तरी आरोग्याचा विचार करता आरोग्य तज्ज्ञ इडलीबद्दल काय म्हणतात हे पाहाणं जास्त महत्त्वाचं आहे. तज्ज्ञ म्हणतात की दिवासाच्या इतर कोणत्याही वेळेपेक्षा सकाळच्या नाश्त्यात इडली खाल्ल्याने आरोग्यास फायदा होतो.

Image: Google

नाश्त्याला इडली का खावी?

1. इडलीत प्रथिनांचं प्रमाण भरपूर असतं. सकाळची सुरुवात करताना आहारात प्रथिनं भरपूर असणं आवश्यक असतात. शरीराच्या प्रथिनांची ही गरज इडलीद्वारे भागवली जाते. तसेच इडलीत कर्बोदकंही असतात, जी शरीरास फायदेशीर असतात. इडलीतल्या या गुणधर्मांमुळे इडली खाल्ल्याने पोट भरल्यासारखं होतं आणि हलकं फुलकं खाल्ल्याचं समाधान मिळतं. 

2. इडली ही लो कॅलरी डाएट म्हणून ओळखली जाते. इडली तयार करताना ती वाफेवर केली जाते. त्यामुळे यात कॅलरीज कमी असतात. दिवसभरात आपल्याला साधारणत:  2000 कॅलरीज असलेला आहार आवश्यक असतो. एका इडलीमधे 40 इतक्या कमी कॅलरीज असतात. इडलीत कोलेस्टेराॅल, संपृक्त चरबी ( सॅच्युरेटेड फॅटस), चरबी नसते. तज्ज्ञ सांगतात की, आहारात सॅच्युरेटेड फॅटस कमी असतील तर हदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. तसेच इडलीत कॅलरीज कमी असल्याने, त्यात फॅटस नसल्याने वजन कमी करण्यासाठी इडली चटणी नाश्त्याला खाणं योग्य असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

Image: Google

3. सकाळच्या नाश्त्यात इडली खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहातो. इडलीमधे सोडियमचं प्रमाण कमी असतं. एका इडलीत 65 मिलिग्रॅम इतकं कमी सोडियम असतं. म्हणून इडली खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका टळतो आणि रक्तदाब नियंत्रित राहातो. तज्ज्ञ सांगतात दिवसभरात कधीही इडली खाल्ली तरी चालते. पण सकाळी नाश्त्याला खाल्ली तर त्याचा आरोग्यास फायदा जास्त होतो. 

4. इडली करताना तांदूळ आणि उडदाच्या डाळीचा उपयोग केला जातो. उडदाच्या डाळीत फायबरचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळेच इडलीत फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्याचा फायदा पचन नीट होण्यास होतो. 

5. इडली ही केवळ चविष्ट खाद्यप्रकार नाही. तर इडलीमधे शरीरास उपयुक्त कर्बोदकं, प्रथिनं, पचनास मदत करणारे विकर, आरोग्यदायी फॅटस, अमिनो ॲसिड आणि फायबर हे आरोग्यास लाभदायक घटक असतात. तसेच सोडियमचं प्रमाण कमी असल्यानं इडली चटणी नाश्त्याला खाल्ल्यास त्याचा फायदा हाडांचं आणि किडनीचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यास होतो. 

6. इडलीची पौष्टिकता त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या नारळाच्या ओल्या चटणीमुळेही वाढते. तसेच इडलीसोबत चटणी आणि भाज्या घातलेल तुरीच्या डाळीचा सांबार खाल्ल्यानं शरीराला प्रथिनं, फायबर आणि आवश्यक ॲसिड आणि विकर एकाच वेळी मिळतात. इडली चटणी आणि सांबार हे हेल्दी काॅम्बिनेशन म्हणूनच सकाळच्या पहिल्या आहाराच्या वेळी म्हणजेच नाश्त्याच्या वेळी सेवन करणं फायदेशीर मानलं जातं. 

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सआहार योजनाहेल्थ टिप्स