Join us

नाश्ता करताना 'या' ६ चुकांमुळे वाढू शकतो लठ्ठपणा, वजन कमी करायचं असेल तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:50 IST

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच लोक नाश्ता करताना अशा चुका करतात ज्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. नाश्ता करताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊया...

सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार आहे. अशा वेळी पौष्टिक काही खाल्ल्यास आरोग्य सुधारतं, पण नाश्ता नीट न केल्यास आरोग्याला हानी पोहोचतेच आणि वजनही वाढू शकतं. अनेक वेळा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच लोक नाश्ता करताना अशा चुका करतात ज्यामुळे लठ्ठपणा झपाट्याने वाढतो. नाश्ता करताना कोणत्या चुका करू नये हे जाणून घेऊया...

'या' चुकांमुळे वाढतं वजन 

नाश्त्यामध्ये पोषक तत्वांचा अभाव

प्रोटीनयुक्त नाश्ता केवळ वजन कमी करण्यातच नाही तर वजन मॅनेज करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा वेळी जर प्रोटीनचा नाश्त्यामध्ये समावेश केला नाही तर पुन्हा थोड्याच वेळात भूक लागते, ज्यामुळे नंतर जास्त प्रमाणात खाल्लं जातं. प्रोटीन व्यतिरिक्त नाश्त्यामध्ये फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचा समावेश करणं देखील खूप महत्वाचं आहे.

गरजेपेक्षा जास्त सुपरफूड खाणं

असे अनेक पदार्थ आहेत जे भरपूर पोषक असतात आणि म्हणूनच त्यांना सुपरफूड म्हणतात. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आणि म्हणूनच हे सुपरफूड मर्यादित प्रमाणातच सेवन करणं महत्त्वाचं आहे. या सुपरफूडमध्ये फ्लेक्स सीड्स, सफरचंद, ओट्स, बटर यांचा समावेश होतो.

योग्य प्रमाणात न खाणं

असे अनेक खाद्यपदार्थ आहेत जे आरोग्यदायी असतात पण जर ते योग्य प्रमाणात खाल्ले गेले नाहीत तर त्यांचा प्रभाव निम्म्यावर येतो. ओट्सचंच उदाहरण घेतलं तर नाश्त्यात जास्त प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.

नाश्ता न करणं

अनेकांना असं वाटतं की, जर त्यांनी रात्री खूप खाल्लं असेल तर दुसऱ्या दिवशी नाश्ता न केल्याने त्यांचं वजन कमी होऊ शकतं. पण, नाश्ता वगळण्याऐवजी योग्य प्रमाणात नाश्ता करणं महत्त्वाचं आहे. सामान्य दिवसातही नाश्ता न केल्यामुळे वजन कमी होत नाही उलट वजन वाढतं आणि लठ्ठपणा वाढतो.

नाश्त्यामध्ये योग्य गोष्टींचा समावेश न करणं

तुम्ही जर बाजारात विकली जाणारी बिस्किटं, ब्रेकफास्ट बार किंवा ब्रेकफास्ट ड्रिंक्सचं सेवन करत असाल तर त्याचा तुमच्या वजनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कारण या पदार्थांमध्ये रिफाईंड शुगर असते ज्यामुळे वजन वाढतं.

योग्य वेळी नाश्ता न करणं

नाश्त्याच्या वेळेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. साधारणपणे सकाळी ७ ते ९ ही वेळ नाश्त्यासाठी योग्य मानली जाते. सकाळी ९ वाजल्यानंतर नाश्ता केला तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.  

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स