आजचं धावपळीचं जगणं हे अनारोग्याचं आणि वजनवाढीचं कारण होत आहे. अशा परिस्थितीत थोडा वेळ काढून स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे. स्वत:ची काळजी घेणं म्हणजे केवळ ब्यूटी ट्रीटमेण्ट घेणं नव्हे. फिटनेसची काळजी सगळ्यात महत्त्वाची. व्यायामाला वेळ आणि डाएटचा विचार करण्याची, तशी सोय करण्याची सवड स्वत:ला द्यायला हवी. ती जर मिळत नसेल तर आहे त्या वेळात काहीतरी करुन वेळ निभावण्यापेक्षा आपल्या आरोग्यासाठी काय चांगलं आणि आवश्यक आहे ते समजून त्यापध्दतीनं उपाय करण्याची गरज आहे. डाएट म्हणजे कमी खाणं किंवा सोपं काही तरी करणं नव्हे तर डाएट म्हणजे योग्य प्रमाणात, पोषणमुल्यं असलेला आहार घेणं होय. यासाठीचे पर्याय कधी सोपे असतात तर कधी थोडे वेळ खाणारे असतात. कमी वेळातला पौष्टिक पर्याय म्हणजे उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड.
Image: Google
आरोग्यासाठी , वजन कमी करण्यासाठी सॅलेड खाण्याला महत्त्व आहे. पण सॅलेड खाणं म्हणजे कच्च्या भाज्या खाणं नव्हे. सॅलेड वेगवेगळ्या पध्दतीनं केलं जातं. उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड ही पध्दत वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वजन कमी करण्यासोबतच शरीरातील आवश्यक पोषण मुल्यांची कमतरता उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाऊन भरुन काढता येते.
Image: Google
उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड करताना वेगवेगळ्या भाज्या एकत्र केल्या जातात. हे सॅलेड तेव्हाच फायदेशीर ठरतं जेव्हा भाज्या योग्य प्रमाणात घेऊन त्या एकत्र केल्या जातात.तसेच या सॅलेडमध्ये भाज्या उकडणं आवश्यक असतं. खूप उकडल्या तर त्या खूप शिजून त्यांच्यातील पोषणमुल्यं नष्ट होतात. असं सॅलेड वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं नाही आणि त्यातून शरीरास आवश्यक पोषणमुल्यंही मिळत नाही. भाज्यांचं प्रमाण, उकडण्याची पध्दत नीट समजून मग हे सॅलेड केलं तर फायदेशीर ठरतं.
Image: Google
कसं करायचं उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड?
उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड करण्यासाठी 1 हिरवी शिमला मिरची, 1 पिवळी सिमला मिरची, 10 घेवड्याच्या शेंगा, 1-2 टमाटे, 3 बेबी काॅर्न, 2 गाजर , ब्रोकोली आणि ऑलिव्ह तेल किंवा मोहरीचं तेल , आवश्यकता वाटल्यास थोडं मीठ, 4-5 काजू, मिरेपूड एवढं साहित्य घ्यावं.
सॅलेड करण्यासाठी ब्रोकोली निवडून ती पाण्यात उकळून मऊ करुन घ्यावी. इतर सर्व भाज्या स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्याव्यात. कढईत थोडं ऑलिव्ह किंवा मोहरीचं तेल घालावं. ते गरम झालं की त्यात आधी बेबी काॅर्न घालून ते परतावेत. मग सर्व चिरलेल्या भाज्या घालाव्यात. त्या हलवून घेतल्या की त्यात थोडं पाणी घालावं. कढईवर झाकण ठेवून भाज्यांना वाफ काढावी. मंद गॅसवर भाज्यांना केवळ 5 -7 मिनिटं वाफ येऊ द्यावी. त्याच्यापेक्षा जास्त वाफ आणल्यास भाज्या एकदम शिजतात. मिक्सरमध्ये काजू, मिरेपूड आणि थोडं ऑलिव्ह तेल एकत्र करुन वाटावं. ही पेस्ट एका वाटीत काढून घ्यावी.
गॅस बंद केल्यानंतर आवश्यकता वाटल्यास यात थोडं मीठ घालावं. नाही घातलं तरी चालतं. उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाताना मिक्सरमधून बारीक केलेली पेस्ट सॅलेडवर टाकून सॅलेड खावं.
Image: Google
उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाणं महत्त्वाचं का?
1. उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाल्ल्याने वजन वेगानं कमी होण्यास मदत होते.
2. विविध भाज्या एकत्रित केलेल्या असल्याने उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाऊन खनिजं, जीवनसत्त्वं आणि फायबर हे महत्त्वाचे घटक मिळतात.
3. या सॅलेडमधील ॲण्टिऑक्सिडण्टस मुक्त मुलकांपासून शरीराचं रक्षण करतात. त्यामुळे वजन कमी करण्यासोबतच शरीराला पोषण मुल्यं मिळून या सॅलेडमुळे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.
Image: Google
4. उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाल्ल्याने योग्य प्रमाणात फायबर मिळाल्याने पचन तंत्र व्यवस्थित काम करतं.
5. उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड रात्रीच्या जेवणात खावं असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. हे सॅलेड दुपारी खाल्ल्यास पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. सारखी भूक लागत नाही.
6. शरीराला विविध पोषण मुल्यं मिळून शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
7. उकडलेल्या भाज्यांच्या सॅलेडमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं. मधुमेह, हायपरटेन्शन यासारख्या समस्या असतील तर हे सॅलेड खाल्ल्याने या आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होते.